बदलापूरः बदलापुरात गेल्या चार ते पाच दिवसात शहराच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या नाल्यात सात डुकरे मृतावस्थेत आढळून आली. यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधीच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने मृत डुकरांचे अवशेष पाण्यातून काढण्यात आली. मात्र सात डुकरांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बदलापूर पूर्वेतून पश्चिमेला वाहून जाणारा आणि पुढे थेट उल्हास नदीला जाऊन मिळणारा एक नैसर्गिक नाला आहे. गेल्या काही दिवसात या नाल्यात डुकरांचे मृतदेह आढळून आले होेते. आज पुन्हा काही डुकरांचे मृतदेह आढळले. नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना याची दुर्गंधी जाणवली. त्यानंतर त्यांनी नगर पालिका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डुकरांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून जंतुनाशक फवारणी केली आहे. यापूर्वीही काही वेळा नाल्यात डुकराचा एखाद दुसरा मृतदेह आढळून येत होता. मात्र यावेळी एकाचवेळी पाच ते सात डुकरांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून डुकरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डुकरे पालन करणाऱ्या इसमाला पालिका प्रशासनाने नोटीस बजावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. बदलापुरात पावसाळ्यात नालेसफाई करताना नाल्यातील काढलेला गाळ तसाच नाल्याच्या काठावर ठेवला जातो. त्यात येथे हॉटेल व्यावसायिक, फेरिवाले, मास -मासळी विक्रेते मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. डुकरे हा कचरा खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे नगरपालिकेने हा कचरा तातडीने हटवावा अशी स्थानिकांची मागणी आहे.