कल्याण-डोंबिवली शहरांमधील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महिना संपायला पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अजूनही रस्ते, गटारांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही, असा दावा करत आंदोलनाचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
महापालिका अधिकारी, ठेकेदारांनी कामे पूर्ण करण्याचा शब्द पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडी कामे सुरू असलेल्या रस्त्यावर ठाण मांडून बसतील असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीतील नागरिक खोदलेले रस्ते, सिमेंट रस्त्यांच्या संथगती कामांमुळे हैराण आहेत. वाहतूक कोंडीची समस्या या कामांमुळे निर्माण होत आहे. तरीही प्रशासन ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हालचाल करीत नाही. येत्या दहा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. तरीही प्रशासन ही कामे तत्परतेने पूर्ण करण्यासाठी कोणतीही आघाडी घेत नाही. या पाश्र्वभूमीवर मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्वाती कदम, ऊर्मिला तांबे, शीतल विखणकर, वर्षां भोसले, प्राची मोरे, शीतल देवळालकर, चेतना रामचंद्रन यांनी उपायुक्त दीपक पाटील यांची भेट घेतली. त्यांना शहरात सुरू असलेली सिमेंट रस्ते, सेवा वाहिन्या, जल, मलनिस्सारणाची कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करावीत अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यात आली नाहीत तर या रखडलेल्या कामांच्या ठिकाणी महिला आघाडी ठाण मांडून बसतील, असा इशारा देण्यात आला.
रस्त्यांच्या कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अन्यथा आंदोलन
कल्याण-डोंबिवली शहरांमधील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
First published on: 26-05-2015 at 01:31 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deadline for road work before monsoon