पथकाच्या प्रमुखाकडून दिल्या जाणाऱ्या ऑर्डरनुसार, वाद्यांच्या तालात, एका लयींत पुढे चाल करणे, म्हणजे संचलन. सहाजिकच लयबद्ध संचलनासाठी हातापायांच्या हालचालींसोबत समन्वयासाठी वदन आणि श्रवण या दोघांचीही गरज लागते. पण या दोन्ही गोष्टी नसतानाही शिस्तबद्ध आणि लयबद्ध संचलन करून डोंबिवलीतील ‘रोटरी स्कूल फॉर डेफ’ या शाळेच्या मूक आणि कर्णबधिर मुलांनी सर्वाची मने जिंकली. निमित्त होते ठाणे वाहतूक पोलिसांच्या रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या समारोपाचे.
वाहतूक पोलिसांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या संचलन कार्यक्रमात विविध पथके सहभागी होतात. डोंबिवलीतील ‘रोटरी स्कूल फॉर डेफ’ शाळेचे विद्यार्थीही गेल्या १४ वर्षांपासून यात सहभागी होत आहेत. यंदा या पथकाचे नेतृत्व कमांडर स्वेता नवले, गौरव पाटील आणि सहदेव जाधव यांनी केले. निसर्गाने त्यांची बोलण्याची आणि ऐकण्याची शक्ती हिरावून घेतली आहे. मात्र, अनुकरणाच्या जबरदस्त ताकदीने या मुलांना संचलन कार्यक्रमात कौतुकास पात्र ठरवले. विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस दलाच्या अंबरनाथ शाखेत कार्यरत असलेले सच्चिदानंद पाटील यांनी या मुलांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या संचलनात विशेष अडचणी येऊ नयेत  म्हणून प्रशिक्षित विद्यार्थ्यांचे एक पथक त्यांच्यासोबत सहभागी झाले होतेच; शिवाय पाटील हे स्वत:ही मैदानाबाहेरून या मुलांना हातवाऱ्यांद्वारे मार्गदर्शन करत होते. ‘संचलन प्रशिक्षणासाठी थोडीफार अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यानंतर मग ही मुले एखाद्या जवानाप्रमाणे संचलनात प्रावीण्य मिळवतात, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. या कामासाठी त्यांनी विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेच्या शिक्षिका शुभांगी गायकर यांच्याकडून मूक व कर्णबधिर मुलांच्या भाषेचे प्रशिक्षण घेतले.
मुलींची आघाडी
यंदा ठाणे येथील शांतीनगर भागातील ‘वीज इंग्लिश हायस्कूल’मधील विद्यार्थ्यांच्या पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. या पथकाचे नेतृत्व कमांडर अखिल बोदूल, प्रियंका बिस्ट आणि मानसी थोरवे यांनी केले, तर शिक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी या पथकाला प्रशिक्षण दिले. उल्हासनगरच्या नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील पथकाला तृतीय क्रमांक मिळाला. पथकाचे नेतृत्व कमांडर प्रियंका बाबर, स्वेता भोईर आणि अमिषा गिरासे या तिघांनी केले तर शिक्षक बबन नवले यांनी पथकाला प्रशिक्षण दिले. संचलनात एकूण १५ पथके सहभागी झाली होती आणि या सर्व पथकांचे नेतृत्व नेहा शिंदे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केले. सलग दुसऱ्यांदा सर्व पथकांचे नेतृत्व करण्याचा मान पटकाविणाऱ्या नेहाचा विशेष सत्कार करण्यात आला. आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे नेहाने सांगितले.
नीलेश पानमंद, ठाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्ता सुरक्षा पथकाच्यानिमित्ताने ही मुले आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शाळाही पोलिसांशी जोडल्या जातात. परिणामी, पोलीस आणि समाज यांच्यातील दुरावा कमी होतो. या प्रवाहात असल्यामुळे ही मुले वाहतुकीचे नियम पाळतील आणि घरातील प्रत्येकाला वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह धरतील.
– डॉ. रश्मी करंदीकर (पोलीस उपायुक्त)  

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deaf and dump students rhythmic march in thane