विमा कंपन्यांची सव्वा कोटीची फसवणूक; कल्याण गुन्हे शाखेकडून दोन डॉक्टरांसह टोळीला अटक
सध्या हयात असलेले दहा जण आणि मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींचे बनावट मृत्यू अहवाल तयार करून त्या आधारे दोन विमा कंपन्यांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने दोन डॉक्टर, मुंब्रा स्मशानभूमीतील एक कर्मचारी आणि यामागील सूत्रधार असलेला कल्याण पूर्वेतील एक रहिवासी यांना अटक केली आहे. या आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.
याप्रकरणी चंद्रकांत नरसिमलू शिंदे (रा. कल्याण पूर्व), ठाणे पालिकेच्या मुंब्रा स्मशानभूमीतील कर्मचारी तेजपाल मेहरोल, डॉ. अब्दुल मोईद सिद्धिकी, डॉ. इम्रान सिद्धिकी (सर्व रा. मुंब्रा) यांना अटक झालेली आहे. ठाणे पालिकेच्या मुंब्रा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आरोपींनी १० जिवंत व्यक्तींच्या मृत्यूची बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याचा आरोप आहे. आंध्र प्रदेशात मरण पावलेल्या तीन व्यक्तींची मृत्यू प्रमाणपत्रेही आरोपींनी मिळवली. याप्रकरणी गुन्हे शाखेने प्राथमिक तपासानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून आरोपींनी विमा कंपन्यांची कोटय़वधींची फसवणूक केल्याचे गुन्हे शाखेचे साहाय्यक निरीक्षक संतोष शेवाळे यांना तपासात आढळले.
या प्रकरणाच्या तपासासाठी निरीक्षक संजू जॉन यांनी शरद पंजे, मारुती दिघे यांच्यासह आठ जणांचे पथक तयार केले. पथकाने चंद्रकांतला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधाराने मुंब्रा स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल, त्यानंतर त्याच्या ओळखीच्या मुंब्य्रातील दोन डॉक्टरांना अटक केली. या मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे चंद्रकांतने बजाज अॅलियान्झ, आदित्य बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्स कंपनी यांची फसवणूक करून विमा दाव्याची ८१ लाख रुपये रक्कम उकळली. उर्वरित ५५ लाख रुपयेही उकळण्याच्या प्रयत्नात तो होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंब्रा विभागातून १३ प्रमाणपत्रे
ठाणे पालिकेच्या मुंब्रा स्मशानभूमीतील कर्मचारी तेजपाल मेहरोल याने डॉ. अब्दुल, इम्रान यांच्याकडून १० जिवंत व्यक्तींचे आणि आंध्र प्रदेशात मयत झालेल्या तीन व्यक्तींचे खोटे मृत्यू अहवाल तयार करून घेतले होते. त्याआधारे ठाणे पालिकेच्या मुंब्रा आरोग्य विभागातून १३ व्यक्तींची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे काढणे चंद्रकांत शिंदे याला शक्य झाले, असा आरोप आहे.