ठाणे : ठाणे शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील शहापूर तालुक्यात एका आठ वर्षीय मुलाचा अचानक आजारी पडून मृत्यू झाला. ओमकार भवर असे या मुलाचे नाव आहे. त्याला सर्पदंश झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाड्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे तसेच या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने ओमकारला वेळेत उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने आणि मुलाच्या पालकांनी केला आहे. ओमकार याच्या मृत्यूने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहापूर येथील वांद्रे भागातील भवरपाड्यात ओमकार हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. तो परिसरातील एका आश्रम शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी तो दुपारी शाळेतून घरी परतला. त्यानंतर मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला. सायंकाळी खेळून आल्यानंतर त्याने अभ्यास केला. त्यानंतर तो जेवण केल्याविना झोपला. मध्यरात्री त्याच्या पोटात अचानक कळा जाणवू लागल्या. त्यानंतर त्याचे वडील, आजोबा त्याला दुचाकीने घेऊन सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील पिवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. निघताना पाड्यातील पायवाट आणि रस्ता अंत्यत चिखलमय होते. पिवळी आरोग्य केंद्रात पोहोचले असता, त्या केंद्राला टाळे होते. त्यामुळे पुढे १३ किलोमीटर अंतरावरील अघई येथील आरोग्य केंद्रात ओमकारला त्याच्या वडिलांनी दुचाकीवरून नेले. तिथे पोहोचत असताना अचानक त्याच्या तोंडातून फेस निघाला. अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर डाॅक्टरांनी त्याला तपासले. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके सुरू होते. पंरतु शारीरिक हालचाल बंद झाली होती. त्यानंतर ओमकारला रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा – एनआयएच्या कारवाईनंतर अतिसंवेदनशील पडघा पुन्हा चर्चेत
या घटनेनंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ओमकारला वेळेत उपचार मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटना आणि ओमकारच्या नातेवाईकांनी केला आहे.