ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आहे.
हेही वाचा >>> कल्याण मध्ये घर जप्तीच्या कारवाईमुळे आत्महत्येचा प्रयत्न
याठिकाणी ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. येथील आरोग्य सुविधेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांकडून तक्रारी येत आहेत. त्याच गुरुवारी दिवसभरात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या समोरच रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांनंतर आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. दरम्यान, कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली असून अतिदक्षता विभागही उपचारासाठी खाटा शिल्लक नाहीत. तसेच जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते, असे स्पष्टीकरण देत रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळून लावले आहेत.