डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात विलगीकरणमध्ये असलेल्या एका आरोपीचा आकडी येऊन डोक्यावर पडल्याने मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दत्तात्रेय वारके या आरोपीवर मानपाडा पोलीस ठाण्यात २५ दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दत्तात्रेयचा शोध घेऊन जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून शनिवारी (२६ फेब्रुवारी) अटक केली होती. रविवारी पोलिसांकडून आरोपीला सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
आधारवाडी कारागृहात आरोपीला नेण्यापूर्वी त्याची करोना चाचणी करणे आवश्यक असते. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी दत्तात्रेयला पोलीस ठाण्यात आणून विलगीकरण कक्षात ठेवले. त्याला दारूचे व्यसन होते. दारू न मिळाल्याने आरोपी अस्वस्थ होता. रविवारी (२७ फेब्रुवारी) संध्याकाळी पोलिसांनी त्याला करोना चाचणीसाठी नेण्याची तयारी केली. त्यावेळी त्याला जोरात आकडी आली.
“आकडी आल्यानंतर आरोपी डोक्याच्या दिशेने जमिनीवर पडला. त्याला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात २ तास आरोपीने उपचाराला प्रतिसाद दिला. रविवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी दत्तात्रेयचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला,” अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.
हेही वाचा : डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी शेखर बागडे करत आहेत.