पोलिसांनी आरोप फेटाळून फिट येऊन मृत्यू झाल्याचा केला दावा; याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू
कल्याण पूर्व भागातील एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तर फिट येऊन मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनी या प्रकरणाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱी यांच्यामार्फत चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या चौकशीनंतरच मृत्यू कसा झाला, याचे कारण स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा >>>“सर्वोच्च शक्तीमान माणूस कोण?”, जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपामुळे नव्या चर्चेला सुरुवात
कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. ती सर्व माहिती तातडीने गुन्हे शाखा, न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशीसाठी देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी सांगितले. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान प्रतिश भिंगारदिवे (२४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यामुळे त्याचे वडील दीपक भिंगारदिवे (६३) हे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मुलाला पोलीस ठाण्यात का आणले, याची विचारणा करू लागले. प्रतिशची पोलीस चौकशी करत असताना त्याचे वडील दीपक यांनी त्यांच्या मोबाईलमधून पोलीस चौकशीचे चित्रीकरण सुरू केले. मोबाईल मधून चित्रीकरण करू नये असे पोलिसांनी त्यांना समजावले आणि त्यांना पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षामागील भागात बसविले. तेथे त्यांना फिट आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश
ही माहिती तातडीने गुन्हे शाखेला देऊन ते पथक तात्काळ पोलीस ठाण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दीपक यांच्या मृत्यूचा सखोल पंचनामा आणि शवविच्छेदन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबियांचे आरोप
प्रतिश सार्वजनिक ठिकाणी उभा असताना गस्तीवरील पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मुलाला सोडविण्यासाठी वडील दीपक पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भिंगारदिवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असे राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या कुटुंबातील महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी असल्याचे सांगितले.