ठाण्यात शिळ डायघर येथील खिडकाळीगाव भागात संशयित चोरट्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी (३ एप्रिल) उघडकीस आला. राजमन तिवारी असे (४५) मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपी निळकंठ पाटील (४२) यांना अटक केली आहे.
खिडकाळीगाव येथील एका शाळेच्या मागे निळकंठ यांच्या मालकीचे एकमजली घर आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिले आहे. रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मजल्यावरील घरामध्ये कोणीही नसताना एक संशयित चोरटा त्यांच्या घरामध्ये शिरला. याची माहिती रहिवाशांनी निळकंठ यांना दिली. त्यानंतर निळकंठ हे पहिल्या मजल्यावर गेले असता, त्या व्यक्तीने आतून घराचे दार बंद करून घेतले. त्यामुळे निळकंठ यांनी हातातील हातोडीने दरवाजा तोडण्यास सुरूवात केली.
निळकंठ यांनी घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करताच संशयिताने त्यांच्यावर काठीने हल्ला केला. ही काठी खेचून निळकंठ यांनी त्या व्यक्तिच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर घाबरलेल्या व्यक्तिने घराच्या सज्जामधून पळ काढण्यास सुरूवात केली. तो पळून जात असताना निळकंठ यांनी त्याला परिसरातील एका अंगणात पकडले. तसेच काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याचे दोन्ही पाय बांधून त्याच्या पाठीवर, पोटावर आणि हाता-पायावर पुन्हा काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली.
हेही वाचा : कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिसाला मारहाण
या घटनेची माहिती स्थानिकांनी शिळ डायघर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यास कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची माहिती घेतली असता त्याचे नाव राजमन तिवारी असल्याचे समजले. शवविच्छेदन अहवालातही त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी निळकंठ यांना अटक केली आहे.