उल्हासनगरः एका खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका २८ वर्षीय डॉक्टरचा उल्हासनगरात मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या १७ सेक्शनच्या हिरा घाट परिसरात हा अपघात झाला असून खड्ड्यामुळे तरूण डॉक्टरचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतो आहे. हनुमंत डोईफोडे असे या डॉक्टरांचे नाव असून ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.

उल्हासनगरातील रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चिला जातो. अनेक अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोबतच अनेक जण जखमीही झाले आहेत. अशाच एका अपघातात एका युवा डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प तीन परिसरातील १७ सेक्शन हिरा घाट परिसरात रविवारी डॉ. हनुमंत डोईफोडे प्रवास करत असताना दुपारी दोनच्या सुमारास खड्ड्यामुळे दुचाकी घसरली आणि ते पडले. त्यानंतर त्यांना तातडीने कल्याणच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अती रक्तस्त्राव आणि फुफुसाला इजा झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

डॉ. हनुमंत डोईफोडे मुळचे बीड जिल्ह्यातील केजकासरी या गावातील होते. ते गेल्या दीड वर्षांपासून उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेनंतर उल्हासनगर शहरातील खड्ड्यांवरून पालिका प्रशासनावर नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जाते आहे. या भागातील रस्त्याची दुरावस्थे गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. या भागात फोटो प्रक्रिया आणि वाहनांच्या सुट्या भागाच्या दुकानांचे बाजार आहे. त्यामुळे येथे दररोज हजारो ग्राहक येत असतात. त्यानंतरही येथील रस्त्यांची स्थिती सुधारत नसल्याने नागरिकांत संताप आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader