कल्याण – कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे स्वीय साहाय्यक नीलेश रसाळ यांना एका अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तु महेश गायकवाड यांची न्यायालयीन कामे करतोस काय, असे बोलत धमकी देणारा मी बाहेर येऊन तुला बघतो, अशा धमक्या देत होता.

याप्रकरणी नीलेश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून मागील वर्षापासून कल्याण पूर्वेत राजकीय वातावरण तप्त आहे. महेश यांच्यावरील गोळीबार प्रकरणी माजी आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. बुधवारी सकाळी गणपत गायकवाड यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एका न्यायालयीन प्रकरणासाठी पोलिसांनी आणले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी न्यायालय आवारात गर्दी केली होती.

गणपत गायकवाड यांना न्यायालयात आणल्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे महेश गायकवाड यांची न्यायालयीन कामे करणारे स्वीय साहाय्यक नीलेश रसाळ यांना त्यांच्या मोबाईलवर एका हिदी भाषक व्यक्तिने संपर्क साधला. त्याने नीलेश रसाळ यांना तु महेश गायकवाड यांची न्यायालयीन कामे करण्यासाठी खूप धावाधाव करतोस काय. तुला बाहेर येऊन बघतो. तुझ्यामध्ये खूप शक्ती आली आहे काय आता. बाहेर आल्यानंतर तुला पळता भुई थोडी करून मारतो, अशी धमकी देणारा बोलत होता.

आपण कुठून बोलता, या नीलेश यांच्या वक्तव्यावर तुझा बाप बोलतोय, तुला बाहेर येऊन सगळे सांगतो, असे बोलून नीलेश यांना जीवे ठार मारण्याची धमकी अज्ञात इसम देत होता. याप्रकरणी नीलेश यांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली आहे.

यापूर्वी महेश यांनाही अज्ञातांनी जीवे ठार मारण्याच्या धमक्या, पत्रे पाठवली आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुका जवळ येतील तसे तसे हे प्रकार वाढण्याचे अंदाज जाणकारांकडून वर्तवले जात आहेत.