ठाणे : भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतून सोमवारी आणखी दोन मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दिनेश तिवारी (३४) आणि अशोक मिश्रा (३२) अशी मृतांची नावे आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या आठ इतकी झाली आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पथकाने शोधकार्य थांबविले. दरम्यान, बेकायदेशीर खोल्यांचे बांधकाम करणे, इमारतीवर मोबाईल टॉवर उभा केल्याने दुर्घटना झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. 

वळपाडा येथील कैलासनगर परिसरात वर्धमान कंपाऊंड परिसरात नऊ वर्ष जुनी तळ अधिक तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली होती. या घटनेनंतर शनिवारी दुपारपासून ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांची पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेत होते. शनिवारी रात्री पथकाने नवनाथ सावंत, ललिता महोतो आणि सोना कोरी यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तर नऊ जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर रविवारी सकाळी शोध कार्य सुरू असताना तब्बल २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेले सुनील पिसाळ यांना सुखरूप बाहेर काढण्यात पथकांना यश आले. त्यानंतर सुधाकर, प्रवीण आणि त्रिवेणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या सहा इतकी झाली होती. या ढिगाऱ्याखाली  आणखी काही व्यक्ती अडकल्याचा अंदाज असल्याने सोमवारी देखील शोध कार्य सुरू केले. या शोधकार्यात पथकाला दिनेश तिवारी आणि अशोक मिश्रा यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर शोधकार्य करणाऱ्या पथकांनी उद्घोषणा करत कोणाचे नातेवाईक अडकले आहेत का, याबाबत चौकशी केली. अखेर सोमवारी सकाळी ९.४५ वाजता हे शोधकार्य थांबविण्यात आले.

‘देखभाल- दुरुस्तीही नव्हती’

याप्रकरणात पोलिसांनी इमारतीचा मालक इंद्रपाल पाटील याला अटक केली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बेकायदा खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. तसेच इमारतीवर एक मोबाईल टॉवरही होता. इमारतीची देखभाल- दुरुस्तीही केली जात नव्हती, असे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader