भाग भांडवल बाजारात गुंतवणूक करून दीड वर्षात तिप्पट आणि दररोज अर्धा टक्के परतावा मिळवून देतो असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात नौपाडा आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे सात ते आठ हजार नागरिकांची सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. या दोन्हीप्रकरणात एकच तक्रारदार आहे असून यातील एका प्रकरणात पोलिसांनी रितेश पांचाळ आणि त्याचा सहकारी मोहन पाटील अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.
यातील पहिल्या प्रकरणात तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते भाग भांडवल बाजारात दलाल म्हणून काम करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एका परिचिताने त्यांना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महाकाली ग्रुप ऑफ कंपनी या कंपनीच्या कार्यालयात नेले. या कंपनीच्या कार्यालयात पोहचले असता, तिथे अनेकजण गुतंवणूकीसाठी आले होते. त्यावेळी कार्यालयात मोहन पाटील हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या कंपन्यांच्या एकूण १६ उप कंपन्या असून यातील द मॅजिक ३ एक्स क्रिप्टो कंपनी ही सर्वाधिक नफा मिळवून देणारी कंपनी असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये कमीत कमी २४ हजार रुपये गुंतवणूक करता येऊ शकत होती. २४ हजार रुपये गुंतवणूक केल्यास २० महिन्यांनी तिप्पट परतावा मिळेल तसेच दररोज अर्धा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त परतावा मिळणार असल्याचे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. मोहन पाटील तेथे जमलेल्या गुंतवणूकदारांचे दोन तासांचे शिबीर घेतले. तसेच या कंपनीचे संचालक रितेश पांचाळ असून कंपनीत आतापर्यंत ५० हजार पेक्षा अधिक समाधानी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असल्याचा दावा केला. त्यानंतर तक्रारदार यांनी रितेश यांची पवई येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि २९ जुलैला २४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या योजनेत दिवसाला परतावा मिळणार असल्याने तक्रारदार यांनी ३ ऑगस्टला त्यांचा जमा झालेला परतावा काढण्यासाठी कंपनीला संपर्क साधला असता त्यांना आता रक्कम काढू नका तुमच्या परताव्यात वाढ होईल असे सांगितले.
तक्रारदार यांना योजनेविषयी संशय आल्यानेत त्यांनी कंपनीची माहिती काढली त्यावेळी त्यांना या कंंपनीत गुंतवणूक करु नका असा संदेश देणारे एनएसईचे पत्रक सापडले. त्यानंतर त्यांनी रितेश पाटील, मोहन पाटील यांच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारदार यांनी अशाचप्रकारे एफ्ल्यूक्स कॅपीटलमध्ये गुंतवणूक केली होती. या कंपनीतही त्यांना तिप्पट परताव्याचे अमीष दाखविण्यात आले होते. येथे गुंतविलेले पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही प्रकरणात सुमारे सात ते आठ हजार जणांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांना अजून त्यादिशेने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास सुरू आहे.