ठाणे : महापालिका निवडणूकांपूर्वी ठाण्यात भाजपने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आठवड्याभरापूर्वी ठाण्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर रविवारी कळव्यातील ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह काही कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला कळव्यात धक्का बसला आहे. यावेळी भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिवसेना (शिंदे गटाची) ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच भाजपने ठाणे शहरात भाजपला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे महापालिका निवडणूकांपूर्वीच वन मंत्री गणेश नाईक यांनी ‘ठाण्यात फक्त कमळ’ अशी घोषणा केली होती. त्यानुसार, आता भाजपची ठाण्यातील वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे. आठवड्याभरापूर्वीच वसंत विहार भागातील शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी त्याचे पती भास्कर बैरीशेट्टी यांच्यासह भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरूच असल्याचे दिसत आहे. रविवारी भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे कळवा येथील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर भानुदास जमदाडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांची भाजपा संघटनेत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे शहर-जिल्ह्यात भाजपला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद आहे. सध्या महापालिकेत प्रशासक असले तरी शिवसेनेच्या बहुतांश माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. त्यातच भाजपने ठाण्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याची घोषणा केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.

Story img Loader