भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गिकेची नव्याने रचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो प्रकल्पात दुसऱ्या टप्प्यात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर  टेमघपर्यंतच्या ३ किलोमीटर भागात १,५९७  बांधकामाच्या निष्कासनासह १८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी निष्कासन आणि भूसंपादन करत हा मेट्रो मार्ग उभारणीसाठी उन्नत ऐवजी भुयारी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भिवंडी-कल्याण या मार्गातील गोपाळनगर हे मेट्रो स्थानक रद्द करून त्याजागी भिवंडी हे स्थानक उभारले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणीची प्रक्रियाही वेगाने होण्याची आशा आहे.

ठाणे पलीकडील स्ते मार्गावरील भार कमी करण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात आली होती. ही उन्नत मार्गिका ठाण्यातील कापूरबावडी येथून ठाणे- भिवंडी रस्त्याने भिवंडी शहरात राजीव गांधी चौक, भिवंडी येथून कल्याण रस्त्याने राजनोली ते दुर्गाडीपर्यंत व त्यापुढे कल्याण शहरातून कल्याण शीळरोड मार्गे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयापर्यंत प्रस्तावित आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामातील पहिल्या १२.७ किलोमीटर लांबीचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यात भिवंडी ते कल्याणमधील भिवंडी शहरात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदीर, टेमघर या सुमारे ३ किलोमीटर अंतरात मोठय़ा प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहतीची कामे करावी लागणार आहेत. यात सुमारे १,५९७  बांधकामे निष्कासित करावी लागणार आहेत. तर यासाठी रस्ता रूंदीकरणाकरिता १८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे या टप्यातील स्थापत्य कामास अजूनही सुरुवात झालेली नाही. निष्कासन आणि भूसंपादन यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते. त्यामुळे सल्लागारांच्या अहवालानंतर हा मार्ग भूमिगत करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. हा मार्ग भूमिगत केल्यास हटवल्या जाणाऱ्या घरांची संख्या १,५९७ वरून ८६२ वर येणार आहे.

भूमिगत मार्ग असा

या प्रकल्पात धामणकर नाका ते टेमघर मधील उन्नत मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेत बदल करण्याकरीता १,४२७ कोटी खर्च अपेक्षित आहे. भिवंडी शहरामधील रस्ते अरूंद असल्याने या ठिकाणी मेट्रोचे भूमिगत बांधकाम केल्यास शहरातील पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या समस्या कमी होतील. यात धामणकर नाका ते राजीव गांधी चौक या सुमारे १.५ किलोमीटर लांबीतील रस्त्याचे रूंदीकरण करावे लागेल. धामणकर नाका येथे भुयारी मार्ग, सेवा रस्ता, उन्नत मेट्रो, रॅम्प, ओपन कट रॅम्पसाठी रस्ता रूंद करावालागेल. या भूमिगत मार्गिकेत राजीव गांधी चौक येथे ओपन कट रॅम्पद्वारे उन्नत मेट्रो मार्गिका भूमिगत होऊन कल्याणच्या दिशेने कल्याण रस्त्याला समांतर उजव्या बाजूस साईबाबा मंदिरासमोर मोकळय़ा जागेत ओपन कट रॅम्पद्वारे उन्नत होऊन उन्नत टेमघर मेट्रो स्थानकास मिळेल. पुढे ही मार्गिका कल्याणपर्यंत उन्नत असेल.

गोपाळनगर मेट्रो स्थानक रद्द

 धामणकर नाका ते टेमघर मधील विद्यमान उन्नत मार्गिकेमध्ये भिवंडी मेट्रो स्थानक व गोपाळ नगर मेट्रो स्थानक प्रस्तावित आहेत. मात्र  भूमिगत मार्गिकेत उन्नत गोपाळ नगर मेट्रो स्थानकाच्या ऐवजी त्याठिकाणी उपलब्ध मोकळय़ा जागेत भूमिगत भिवंडी मेट्रो स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे गोपाळ नगर मेट्रो स्थानक रद्द करावे लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision basement instead elevation new design bhiwandi kalyan metro line ysh
Show comments