जयेश सामंत

ठाणे, मीरा- भाईंदर शहरांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटत्या प्रभावामुळे निर्णय

ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ठाणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जनमानसातील घटते पाठबळ आणि मीरा-भाईंदर शहरात पक्षाची झालेली तोळामासा अवस्था या कारणांमुळेच माजी मंत्री गणेश नाईक यांनी येथून निवडणूक लढण्यास नकार दिल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना-भाजप युतीचे आव्हान मोडून काढण्यासाठी गणेश नाईकांनीच ही निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातून होत असला तरी, ठाणे शहरातील पिछाडी धोकादायक ठरेल, या भीतीनेच नाईकांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याचे दिसत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहरांचा समावेश होतो. ठाण्यातील तीन मतदारसंघांचा अपवाद वगळला तर नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात. त्यामुळे १० वर्षांपूर्वी गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून त्यांचे पुत्र संजीव यांना रिंगणात उतरविले, तर शिवसेनेने वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले विजय चौगुले यांना उमेदवारी देऊन संजीव यांच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा केला. ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही चौगुले यांना ठाण्यातून फारसे मतदान झाले नाही. या पराभवातून धडा घेत पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत सेनेने ठाण्यातील उमेदवार दिला. त्यातच मोदी लाटेमुळे शिवसेनेचे राजन विचारे प्रचंड मतांनी विजयी झाले. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील बळ कमी कमी होत चालले आहे.  ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. ठाण्यात राष्ट्रवादीचे जेमतेम आठ नगरसेवक निवडून आले. त्यातही हणमंत जगदाळे व नजीब मुल्ला या स्थानिक नेत्यांचा प्रभाव जास्त होता. मीरा-भाईंदरमध्येही राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना, भाजपची वाट धरल्याने तेथील पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीने आपटी खाल्ली. त्यामुळे सध्या नवी मुंबई शहरातच राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम आहे. या कारणांमुळेच गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे समजते.

ठाणे लोकसभेची निवडणूक यंदा गणेश नाईक यांनीच लढवावी असे शरद पवार यांचे म्हणणे होते. आर्थिक रसद आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची असलेली जाण यामुळे शिवसेनेला या वातावरणात टक्कर देण्याची क्षमता नाईकांमध्ये अधिक आहे हे पक्ष कार्यकर्त्यांचेही म्हणणे होते. काहींनी ते ठाण्यातील बैठकीत बोलूनही दाखविले. मात्र, ठाण्यात शिवसेना आणि भाजपचे वाढलेले बळ पाहून हे आव्हान पेलण्याच्या मन:स्थितीत नाईक सुरुवातीपासूनच नव्हते असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. नाईक यांचे आमदार पुत्र संदीप नाईक यांनीही ही निवडणूक लढवू नये असे स्पष्ट मत त्यांच्यापर्यंत पोहचविले होते अशीही चर्चा आहे.

Story img Loader