ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यातील वास्तू विविध संस्थांना समाज उपयोगी कामांसाठी दिल्या जातात. या वास्तू आता स्वारस्य अभिव्यक्ती सूचना (EOI) काढून रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार आजवर नाममात्र भाडे दराने देण्यात आलेल्या वास्तू ताब्यात घेण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे.ठाणे महापालिका स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यात असलेली सिध्देश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एक १ मजली वास्तू चैत्रगौरी महिला मंडळाला स्वारस्य अभिव्यक्ती सूचना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक रुपया नाममात्र या दराने देण्यात आली होती. त्यासाठी सर्व साधारण सभेने तात्पुरत्या स्वरुपात मान्यता दिली होती.
ही वास्तू आता रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली आहे. तसेच, कोलबाड येथील तळ अधिक एक मजली वास्तू नागेश्वर हेल्थ ॲण्ड स्पोटस् क्लब यांना भाडे कराराने देण्यात आली होती. भाडे कराराची मुदत संपल्यामुळे ही वास्तू देखील स्थावर मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली आहे.त्याशिवाय, सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत येथील आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेली व्यायाम शाळा ही सावरकरनगर रहिवाशी संघ यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कराराची मुदत संपली असून त्याचे ८९ हजार ४४२ रुपये इतके भाडे येणे बाकी होते. त्यापैकी त्यांनी ७ सप्टेंबरला १५ हजार रुपये तर १९ सप्टेंबरला ५२ हजार ८२२ रुपये एवढी रक्कम भरली. आजमितीस २१ हजार ५१७ रुपये एवढी भाडे रक्कम भरणे बाकी आहे. तसेच या वास्तूच्या उर्वरीत जागेत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे स्थावर मालमत्ता विभाग व लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती यांनी संयुक्तपणे ही वास्तू ताब्यात घेतली आहे. तसेच वाघबीळ येथील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महेंद्र चिंतामण पाटील (मया पाटील) यांचेवर एम.आर.टी.पी. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : डोंबिवली पूर्व सुदामवाडीतील रहिवासी कचऱ्याच्या ढिगांनी हैराण
सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत येथील आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेली व्यायाम शाळा वास्तूच्या उर्वरीत जागेत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे राजू शिरोडकर यांचेवर एम.आर.टी.पी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत वाणिज्य गाळयांच्या मागील मोकळया जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्रकाश पायरे यांचेवर एमआरटीपी कायद्यांतर्गत नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण ठाकरे गटाचे असल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर व व्यायामशाळा या वास्तू भाडेतत्वावर विविध संस्थांना दिल्या असून त्यांची मुदत संपलेली आहे. यासाठी नव्याने भाडे करार करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडून स्वारस्य अभिव्यक्ती सूचना काढण्यात येणार आहे. – सहाय्यक आयुक्त महेश आहेर