कल्याण : कल्याण पूर्व पालिकेच्या आय प्रभाग हद्दीत काही जमीन मालकांनी महापालिकेची रस्ते, पाणी पुरवठा योजनेची कामे किरकोळ कारणांवरून रोखून धरली आहेत. हे जमीन पालिकेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार नाहीत. अशा अडथळे आणणाऱ्या जमीन मालकांची बेकायदा बांधकामे शोधून त्या बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आपण अशा प्रकारच्या कारवाईचे नियोजन सुरू केले आहे, असे पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्व भागात नेवाळी ते चिंचपाडा, १०० फुटी रस्ता अशा महत्वपूर्ण रस्त्यांची कामे सुरू आहेत. या दोन्ही कामांमधील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या रस्ते कामांमध्ये काही ठिकाणी स्थानिक जमीन मालकांनी किरकोळ कारणांंवरून अडथळे आणले आहेत. काहींनी आपल्या हद्दीतील रस्ते काम करण्यास न्यायालयाची स्थगिती आणली आहे. हे जमीन मालक निर्माण झालेला तिढा सामंजस्याने सोडविण्यास पुढाकार घेत नाहीत. पालिकेने वारंवार या जमीन मालकांना संपर्क करून निर्माण झालेला तिढा मार्गी लावावा आणि रखडलेले रस्ते काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. त्याला हे जमीन मालक दाद देत नसल्याचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले.

हेही वाचा…निर्बिजीकरणासाठी पालिका नेमणार नवी संस्था, अंबरनाथ नगरपालिकेकडून निविदा जाहीर

नेवाळी ते चिंचपाडा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कोळसेवाडी, काटेमानिवली, तिसगाव नाका भागावर येणारा वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. शंभर फुटी रस्त्यामुळे पुना लिंक रस्ता, काटेमानिवली, मलंग रस्त्यांवर येणारा वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

२७ गाव भागाचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी शासन निधीतून पालिका अमृत योजना राबवित आहे. या योजनेसाठी २७ गाव ग्रामीण भागात जलकुंभ बांधले जात आहेत. या योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. अमृत योजनेतील जलवाहिन्या टाकण्याची कामे २७ गावमधील काही जमीन मालकांनी किरकोळ कारणांवरून रोखून धरली आहेत. हे काम पूर्ण झाले नाहीतर या भागाचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम राहील. असे सांगुनही काही जमीन मालक अमृत योजनेच्या जलवाहिन्या त्यांच्या जमीन हद्दीतून, रस्ते मार्गातून टाकण्यास विरोध करत आहेत. अशा विकास कामांत अडथळे आणणाऱ्या जमीन मालकांची नावे काढून त्यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे, असे पवार यांंनी सांगितले.

हेही वाचा…कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल साहाय्यक शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक

कल्याण पूर्व आय प्रभागातील काही रस्ते, अमृत योजनेतील पाणी योजनेची कामे काही जमीन मालकांनी किरकोळ कारणांवरून रोखून धरली आहेत. ही कामे रखडल्याने ठेकेदाराला पुढील कामे करता येत नाहीत. ही विकास कामे रोखणाऱ्या जमीन मालकांची बेकायदा बांधकामे शोधून ती जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले जात आहे. भारत पवार साहाय्यक आयुक्त,आय प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to take action on illegal constructions against land owners obstructing municipal work in kalyan sud 02