कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक रेल्वे स्थानक भागातील रस्ते, परिसर हा फेरीवाला मुक्त आणि वाहन कोंडी मुक्त ठेवण्यात यावा. पादचाऱ्यांना राखीव असलेला हा भाग पादचाऱ्यांसाठी खुला राहील यादृष्टीने पालिकेसह वाहतूक, पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी पालिकेसह वाहतूक, पोलीस आणि रस्ते संबंधित यंत्रणांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाढती वाहन कोंडी, रेल्वे स्थानक परिसरांना पडलेला फेरीवाल्यांचा विळखा याविषयी शासनाकडे अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. शहरात प्रशासन आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात गणेशोत्सव आणि इतर सण सुरू होणार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व रेल्वे स्थानके परिसर, शिळफाटा रस्ता, मुख्य वर्दळीचे रस्ते पादचारी, वाहनांसाठी मोकळे असतील यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आयुक्त डाॅ. जाखड यांनी पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, वाहतूक पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त धर्य्रेशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त वंदन गुळवे, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून ५० हून अधिक जणांना गंडा घालणारा अटकेत

कल्याण, डोंबिवलीसह पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात अवैध रिक्षा वाहनतळ तयार झाले आहेत. वाहनतळामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशा अवैध वाहनतळांचे पालिका, वाहतूक विभागाने सर्वेक्षण करून ते हटविण्यासाठी आणि या रिक्षांना योग्य ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले.

रेल्वे स्थानक भागातील वाहन कोंडी कमी करण्यासाठी आरटीओ, पालिका, वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई पथके तयार करावीत. ही पथके प्रवासी वर्दळीच्या सकाळी सहा ते सकाळी ११ आणि संध्याकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे स्थानक भागात तैनात ठेवावीत. यामध्ये कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

हेही वाचा – उल्हासनगरमध्ये पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला, श्वान मालकावर गुन्हा दाखल

वाहनतळांसाठी रस्ते भाग निश्चित करावेत. इतर भागात वाहने उभी असतील तर त्यांच्यावर कारवाई सुरू करावी. कल्याणमधील सुभाष चौक ते मोहम्मद अली एक दिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी करावी. स्कायवाॅकवर गैरधंदे चालणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

शिळफाटा रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी या रस्ते मार्गात असलेले महावितरणचे खांब, रोहित्र अन्य भागात स्थलांतरित करण्याची कार्यवाही महावितरणने करावी. या रस्ते मार्गातील अतिक्रमणे ई प्रभाग अधिकारी, पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून काढून टाकावीत, असे आयुक्तांंनी सूचित केले.

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानंतर सण विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते प्रवाशांसाठी मोकळे असले पाहिजेत. रेल्वे स्थानके परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा असला पाहिजे. शहर परिसर वाहन कोंडी मुक्त राहील यादृष्टीने पालिकेसह वाहतूक, पोलीस यंत्रणांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decongest hawkers and vehicular traffic around railway stations in kalyan dombivli commissioner indurani jakhad order ssb