ऋषीकेश मुळे, मानसी जोशी
गुलाबांचे उत्पादन घटल्याने आवक कमी; दरांत वाढ
उत्तरेतून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांचा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्रातील गुलाबाच्या शेतीवर होऊ लागला आहे. गेल्या पंधरवडय़ापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह आसपासच्या शहरांतील गुलाबाची आवक घटल्याने प्रेम दिवसाच्या मुहूर्तावर या फुलाची किंमत कमालीची वाढली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा गुलाबाची सरासरी आवक ६० टक्क्यांनी घटल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एका बंडलामागे ५० ते ६० रुपयांनी दर वाढले आहेत.
दोन आठवडय़ांपूर्वी दिल्लीत गारांचा पाऊस पडला आणि संपूर्ण भारतात थंडीची लाट पसरली. हिवाळा संपता संपता आलेल्या या थंडीच्या लाटेने महाराष्ट्रातील गुलाबाच्या उत्पादनावर संक्रांत आली आहे. पुणे, सोलापूर आणि नाशिक भागात गुलाबाचे सर्वाधिक उत्पादन होते. या भागांतील गुलाबांची निर्यातही होते. मात्र पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेल्याने या भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या नीचांकी थंडीचा परिणाम शेतातून कापणीस आलेल्या गुलाबाच्या फुलांच्या वाढीवर झाला आहे. कळ्यांची योग्य वाढ झाली नसल्याने तसेच फुलांवरील रसशोषक किडय़ांच्या प्रादुर्भावाने यंदा उत्पादन घटले आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्यात गुलाबाची शेती करणारे संतोष धुमाळ यांनी दिली. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर भागांतील गुलाबाची आवक कमी झाली आहे.
व्हॅलेंटाइन डे दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसाच्या आठवडाभर आधीपासून दिवसागणिक प्रेमाचे प्रतीक म्हणून टेडी डे, चॉकलेट डे, रोज डे असे दिवस साजरे करण्यात येतात. या दिवसांत गुलाबाला मोठी मागणी असते. लाल रंगाचे चायना गुलाब मोठय़ा प्रमाणात विकले जातात. यंदा या फुलांच्या दर्जानुसार प्रतिबंडल ४०-५० रुपयांची दरवाढ झाली आहे. पांढरा, पिवळा, गुलाबी आणि केशरी या रंगांचे गुलाबही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने विकले जातात. यंदा या फुलांचे बंडल दीडशे ते दोनशे रुपयांना विकले जात आहेत.
गुलाबाचे भाव (प्रतिबंडल/रु.)
प्रकार पूर्वीचे दर आताचे दर
चायना १४० २००
(दर्जा एक)
चायना गुलाब १०० १५०
(दर्जा दोन)
चायना गुलाब ६० १००
(दर्जा तीन)
व्हॅलेंटाइन डे जवळ येत असल्याने मैत्रिणीला देण्यासाठी लाल रंगाचे गुलाब खरेदी करतो. पण यंदा गुलाबाचे भाव वाढल्याने खिशाला कात्री लागणार आहे. गुलाबाऐवजी चाफ्याची किंवा अन्य कोणती तरी फुले देईन.
– आकाश राजपूत, महाविद्यालयीन विद्यार्थी
पाकळ्यांनाही मागणी
गुलाबाचे एका फूल १० ते १५ रुपयांना विकण्यात येत आहे, तर गुलाबाच्या पाकळ्या १२० ते १६० रुपये किलोने विकल्या जात आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने कार्यालये, हॉटेलमध्ये सजावटीसाठी या सुटय़ा पाकळ्यांना मोठी मागणी असते. यंदा पाकळ्यांच्या किमतीही किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.