सागर नरेकर
नादुरुस्त वाहिन्या, नव्या वाहिन्यांचा अभाव यामुळे ग्राहक तुटला
मोबाइल कंपन्या वेगवेगळ्या सवलतींच्या योजना आखत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भारत संचार निगमच्या सेवेमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहत असल्याने ग्राहक दुरावू लागले आहेत. या अडचणींवर सातत्याने तक्रारी करूनही तोडगा निघत नसल्याने गेल्या १५ वर्षांत बीएसएनएलचे शेकडो ग्राहक दूर गेले असून नव्या वाहिन्याही टाकल्या जात नसल्याने नवा ग्राहकही जोडला जात नाही. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत कमालीची घट आली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही गेल्या १५ वर्षांत बीएसएनएलची ग्राहकसंख्या रोडावली आहे. अंबरनाथ शहरात कानसई, आयुध निर्माणी, लादी नाका आणि आनंदनगर अशा चार भागांत असलेल्या बीएसएनएलच्या केंद्रांची ग्राहकसंख्या २० हजारांच्या घरात होती. मात्र हीच ग्राहकसंख्या आता अवघ्या पाच हजारांवर आली आहे. यात कानसई येथे ३ हजार ५५०, लादी नाका येथे १ हजार १७६, आनंदनगर येथे ९०२ तर आयुध निर्माणी येथील केंद्रात अवघे २३९ ग्राहक शिल्लक आहेत. बदलापूर शहरातही २००५ सालापर्यंत ग्राहकांची संख्या अकरा हजारांच्या घरात होती, मात्र आजच्या घडीला बदलापूर पूर्वेत अवघे २ हजार २२० तर पश्चिमेत ७५० ग्राहक शिल्लक आहेत. धक्कादायक म्हणजे नव्याने देण्यात येणाऱ्या जोडण्यांची संख्याही अवघ्या शंभरच्या घरात असल्याने नव्या ग्राहकांनाही बीएसएनएलची सेवा देण्यात स्थानिक कार्यालये असमर्थ असल्याचे समोर आले आहे. बीएसएनएलच्या इंटरनेट सेवांचीही स्थिती तीच आहे. महत्त्वाच्या बँका, शासकीय कार्यालये आणि काही खासगी उद्योग वगळता इतर ठिकाणी इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे खासगी मोबाइल आणि इंटरनेट कंपन्यांच्या स्पर्धेतून बीएसएनएल बाद झाल्याचेच चित्र आहे.
दुरुस्तीत दिरंगाई
गेल्या ३५ वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या कार्यालयात नव्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती झाली नसल्याची माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी दिली. त्यात देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याची पूर्तता करण्यात वरिष्ठ अधिकारी रस दाखवत नसल्याने दुरुस्तीसाठी मोठा काळ जातो. त्यामुळे ग्राहक कंटाळून सेवा घेण्याचे बंद करत असल्याचे समोर आले आहे.