कल्याण: गेल्या दोन महिन्यापूर्वी येथील रामबाग भागात आपल्या पत्नी आणि मुलाची राहत्या घरात हत्या केलेल्या पती दीपक गायकवाड याने आपल्या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून ७०० गुंतवणूकदारांची सुमारे ४० कोटीची फसवणूक केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीला आला आहे.
कौटुंंबिक वाद, कर्जबाजारीपणा आणि विवाहबाह्य संबंधातील प्रकरणातून गेल्या दोन महिन्यापूर्वी कल्याण मधील रामबाग भागातील एक व्यावसायिक दीपक गायकवाड याने आपली ३५ वर्षाची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची राहत्या घरात हत्या केली होती. या प्रकरणानंतर फरार दीपकला पोलिसांनी औरंंगाबाद येथून अटक केली होती.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दीपकची निधी रिसर्च फर्म नावाची गुंतवणूक कंपनी होती. या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून दीपकने ७०० लोकांकडून वाढीव व्याजाचे आमिष दाखवून सुमारे ४० कोटी रूपये वसूल केले आहेत. दीपकने पती, मुलाची हत्या केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी गुंतवणूकदारांची संख्या आणि फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता तक्रारदार नागरिकांनी व्यक्त केली.