दिपाली केळकर, वृत्त निवेदिका
वृत्तनिवेदिका असल्यामुळे मला वाचनाची आवड आहेच. पण त्याची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली. माझ्या आठवणीमध्ये शाळेत असताना आठवी ते दहावीमध्ये मी कथाकथनाचे कार्यक्रम करायचे. स्पर्धामध्ये भाग घ्यायचे. अनेकदा मला त्यात प्रथम क्रमांकसुद्धा मिळालेला आहे. मुळातच मला कथा वाचायला आणि ती सांगायला खूप आवडायची. त्यामुळे या काळात मी खूप कथा संग्रह वाचले. व. पु. काळे, शं. ना. नवरे, वसुधा मेहेंदळे, ज्योत्स्ना भावे, रत्नाकर मतकरी, पु. भा. भावे यांच्या कथा मी खूप वाचल्या. त्यातील कथा निवडून मी कथाकथन करायचे. लहानपणी मला श्रीकांत सिनकरांच्या पोलीस चातुर्य कथा वाचायला खूप आवडायच्या. मुळातच वाचनाची आवड माझ्या आईवडिलांना होती. तसेच लायब्ररीसुद्धा लावलेली होती. याशिवाय मला चांगले मार्क्स मिळाले तर बक्षीस म्हणून पुस्तक मिळायचं. आई दरवेळी नवीन पुस्तक आणायची. त्यामुळे लहानपणी आणि आताही माझ्याकडे कपडय़ांपेक्षा पुस्तकेच जास्त आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, सानिया आणि गौरी देशपांडे या चारही लेखिकांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. रात्री मला झोप यायची नाही, तेव्हा मी पुस्तक वाचत बसायचे. प्रिया तेंडुलकरांचं ‘पंचतारांकित’ हे पुस्तक असंच वाचून पूर्ण केलं होतं. याशिवाय मी विविध विषयावरची मासिकं, दिवाळीत येणारे अंक हे मी एका बैठकीत वाचून संपवायची. सर्वात जास्त मासिकं, पुस्तकं यामधील येणाऱ्या कोणत्याही विषयावरच्या कथा या माझ्या अत्यंत आवडीच्या. कधी कधी एकदम निराश व्हायला व्हायचं. तेव्हा मंगेश पाडगावकरांचं ‘बोलगाणी’ हे छोटंसं पुस्तक मदतीला यायचं. पाडगावकरांच्या शब्दात किंवा गाण्यात काय जादू आहे कुणास ठाऊक, पण ते वाचण्यामुळे माझ मन आनंदित होतं.
लग्नानंतर मी मॉडेल कोर्डिनेशनचा व्यवसाय आणि दूरदर्शनवर बातम्या द्यायचे. त्यामुळे यात थोडंसं वाचन मागे पडलं. त्यात दूरदर्शनवर बातम्या देत असल्यामुळे मला रोज वर्तमानपत्र वाचायची चांगली सवय लागली आणि ती आजतागायत कायम आहे. आता २००८ पासून निवेदन आणि एकपात्री कार्यक्रम करत असल्यामुळे अत्यंत सहजगतीने आणि जाणीवपूर्वक वेगवेगळी पुस्तक वाचते. विजया मेहता यांचे ‘झिम्मा’, अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’, राजेंद्र बर्वेची पुस्तके मी नातेवाईकाना भेट म्हणून दिलेली आहेत. माझ्या भावाने मला रक्षाबंधनास ‘वाइज अदरवाइज’, ‘गोष्टी माणसांच्या’ ही सुधा मूर्ती यांची पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. माझी वाचनाची आवड बघून नंणदेने प्रकाश नारायण संतांचे चार संग्रह भेट म्हणून दिले आहेत. माझ्याबरोबरच माझे पती श्रीराम आणि मुलीलाही वाचनाची आवड आहे.
ललित लेख आणि व्यक्तिचित्रण हे माझे आवडते विषय. ललित लेखात इंदिरा संतांची ‘मृद्गंध’ आणि ‘फुलवेध’ ही पुस्तके मला खूप आवडली. आताही या पुस्तकांमधील कोणताही लेख मी वाचते. शांता शेळके यांनी लिहिलेली ‘आतला आनंद’, ‘पत्राम पुष्पम’, कविता स्मरणातील आणि वडीलधारी माणसं हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक माझ्या संग्रहात आहे. अरुणा ढेरे यांचे कवितांच्या शोधात, कवितांच्या वाटेवर रूपोत्सव ही पुस्तके मी वाचलेली आहेत. रवींद्र पिंगे आणि दत्ता हलजगीकर यांनी त्यांच्या सहवासात जी थोर माणसे आली त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. शांता शेळके यांच्या नजरेतून बाबूजी, भालजी पेंढारकर, ग. दि. माडगुळकर यांचे चित्रण केलेले आहे. मी महाविद्यालयात असताना मला व. पु. काळे यांना भेटायची संधी मिळाली. मी त्यांना पत्र लिहिलेलं होतं. वपुंनी अत्यंत सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं त्याचं उत्तर अजूनही मी जपून ठेवलेलं आहे. माझा वपुंशी दोनदा भेटीचा योग आला. त्यावेळेस त्यांची कथा ऐकवलेली होती. अजूनही माझ्या डोळ्यासमोर वपु दिसत आहेत.
कार्यक्रमांचे निवेदन करताना मला लेखकांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. मी अलीकडेच प्रतिभा रानडे यांची मुलाखत घेतली. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची, स्मरणवेळा, अबोलीची भाषा तसेच पाकिस्तानच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेले ‘पाकिस्तान अस्मितेच्या शोधात’, ‘बुराख्याडच्या स्त्रिया’, ‘अफगाण डायरी’, ‘फाळणी ते फाळणी’ ही पुस्तके वाचनीय आहेत. अरुणा ढेरे व नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी मी सह्य़ाद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत घेतली. गंगाराम गवाणकर यांचे ‘व्हाया वस्त्रहरण’ वाचण्याचा योग आला. कोल्हापूरला राहत असलेल्या अपंग सामाजिक कार्यकर्त्यां नसिमा हुर्जुक यांचे ‘चाकाच्या खुर्चीतून’ वाचले. ‘डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या निमित्ताने’, ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ वाचले. आचार्य अत्रे यांचे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे पुस्तक मला आवडतं. माझ्याकडे वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तके आहेत. शांता शेळके, अरुणा ढेरे, आचार्य अत्रे, व. पु., रवींद्र पिंगे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई हे माझे आवडते लेखक आहेत. सगळे जातिवंत लेखक आहेत. यांचे लेखन रसदार, घाटदार आहे. तसेच ते विचार करायला लावणारेही आहे.
मी बहुतेक मराठीच पुस्तके वाचते. अशोक पत्की यांचे शब्द सुमनांचे, नेहा वैशंपायन यांची पुस्तके, इसाक मुजावरांच्या ‘सिनेमाची शंभर वर्षे’, ‘गाथा मराठी सिनेमाची’ आदी पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. माझ्या घरात बुकशेल्फला वेगळी अशी एक खास जागा आहे. पण तो बुकशेल्फही आता कमी पडायला लागला आहे. घरात हॉलमध्ये, खिडकीमध्ये बसून मला पुस्तकं वाचायला आवडतात. तिथे सूर्यप्रकाश पण येतो आणि वाचायलाही प्रसन्न वाटतं. शिरीष कणेकरांची पुस्तके वाचायलाही मला खूप आवडतात. आता अनेक पुस्तके इंटरनेटवर आलेली आहेत. मला मात्र पुस्तके हातात घेऊन वाचायला आवडतात. बदलापूरला राहत असल्यामुळे खूपशी पुस्तके बदलापूर ते दादर अशा ट्रेनच्या प्रवासात वाचून संपतात. आजची तरुणाई पुस्तके वाचत नाही अशी ओरड ऐकायला मिळते. मला असे काही वाटत नाही. इ बुक्स, पुस्तक मेळावा, साहित्य संमेलन यामुळे आपली वाचन संस्कृती टिकून आहे.