डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या महिन्यात सुवर्णा सरोदे (२६) या गर्भवती महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्यूला पालिकेने नियुक्त केलेल्या नवी मुंबईतील मे. एमके फॅसिलिटीस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीतील दोन स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टर जबाबदार असल्याचा ठपका पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने ठेवला आहे. बाह्यस्त्रोत संस्थेतील डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मे. एमके फॅसिलिटीस सर्व्हेिस या संस्थेवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे.

सुवर्णा यांच्यावर सिझरिन शस्त्रक्रिया करणाऱ्या, शस्त्रक्रियेनंतर निष्काळजीपणा करणाऱ्या डाॅ. मीनाक्षी केंद्रे, डाॅ. संगीता पाटील या दोन्ही स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टरांंवरही कारवाई करण्यात यावी. सुवर्णा यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी केली आहे. गेल्या महिन्यात डोंबिवलीत मोठागावमध्ये राहणाऱ्या सुवर्णा सरोदे या प्रसूृतीसाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांची पहिली सिझरिन शस्त्रक्रिया झाली असल्याने दुसऱ्यांदा बाह्यस्त्रोत संस्थेच्या डाॅ. संगीता पाटील यांनी त्यांची सिझरिन शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर सुवर्णा यांची प्रकृती ढासळत गेली. पालिकेच्या पॅनलवरील वरिष्ठ तज्ज्ञ डाॅक्टरांनी रात्री उशिरापर्यंत सुवर्णा यांच्यावर उपचार करून त्यांना सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न असफल झाले. रात्री उशिरा सुवर्णा यांचा मृत्यू झाला होता.

सुवर्णा यांच्या मृत्यूनंतर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या दोन स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन केल्या होत्या. उपायुक्त बोरकर समितीने प्रशासकीय त्रृटी, हलगर्जीपणाचा विचार करून या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत बाह्यस्त्रोत संस्थेचे डाॅ. मीनाक्षी केंद्रे, डाॅ. संगीता पाटील यांच्यावर ठपका ठेऊन त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांचा अहवाल येईपर्यंत कमी करणे योग्य होईल, असे मत समितीने नोंदवले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविषयी शासनस्तरावर आवाज उठविणे आवश्यक होते, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

पालिका रुग्णालयांमध्ये पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून याप्रकरणातील जबाबदार बाह्यस्त्रोत संस्था आणि डाॅक्टरांवर पालिका, शासनाने कठोर कारवाई करावी. रुग्णांना तत्पर आणि अत्याधुनिक सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.सामान्य नागरिक पालिका रुग्णालयातील व्यवस्था, डाॅक्टरांवर विश्वास ठेऊन उपचारासाठी येतात. डाॅक्टर, व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप महिलांचा जीव जात असेल तर नागरिकांचा पालिका, सरकारी रुग्णालयांवरील विश्वास उडेल. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक दोषींवर कारवाई झाली पाहिजे. दीपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख,डोंबिवली.

Story img Loader