हिरव्यागर्द सावलीतला टुमदार निवारा

घाट आणि कोकण यांना जोडणारे माळशेज आणि नाणे घाट हे दोन घाटमार्ग असल्याने मुरबाड तालुका अगदी सातवाहन काळापासून महत्त्वाचा आहे. या भागात अनेक ऐतिहासिक खुणा आढळतात. मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठमोठे वाडे, हवेल्या आहेत.    जुन्या मुरबाडमधील देहेरकर वाडा त्यांपैकीच एक..

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

सातवाहनपूर्व काळापासून ‘मुरबाड’ तालुका व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या काळी ठाण्यातील घोडबंदरपासून सुरू होणारा व्यापार पुढे मुरबाड-नाणे घाटमार्गे पैठणमधील मोठय़ा बाजारपेठेत जात असे. अशा प्रकारे व्यावसायिक दृष्टीने महत्त्व असलेल्या मुरबाड तालुक्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथील जुन्या वास्तू. पूर्वीच्या काळी अन्य तालुक्यांप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही बारा बलुतेदार पद्धत प्रचलित होती. विशेष म्हणजे बारा बलुतेदारांमध्ये असणाऱ्या सर्व समाजांतील लोकांच्या वास्तूंमध्ये वेगळेपण आहे. किंबहुना म्हणूनच या वास्तू आजही हौशी मंडळींसाठी आकर्षणाचा आणि इतिहासकारांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरोशी, वैशाखरे, नारिवली, जांभुर्डे, बांगरपाडा, माजगाव, पारताळा, नेवाळपाडा, वडवली, उंबरपाडा, शिवळे, तोंडली आदी गावांमध्ये जुन्या वास्तू अस्तित्वात होत्या. तालुक्यातील काही गावांमध्ये आजही जुन्या वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. यामध्ये झुंजारराव (नेवाळपाडा, शिवळा), बांगर (बांगरपाडा), घोलप (दसई), मोरे (पळू), विशे (सोनावळा), समर्थ (पेंढरी), भुसारी, प्रधान, पोतदार, बोकड (कोतवालनगर), भदे, देहेलकर (कोतवालनगर) आदी कुटुंबीयांच्या वास्तूंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, असे अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड सांगतात.

जुन्या मुरबाडमधील कोतवालनगर परिसरात पोहोचल्यानंतर एक वाडा आपल्याला स्वत:जवळ आकर्षित करून घेतो. तो वाडा म्हणजे ‘देहेरकर वाडा’. वाडय़ाच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीवर ‘देहेरकर वाडा’ लिहिलेली पाटी आपल्याला दिसते अन् मग वाडय़ाच्या प्रवेशद्वारातून वाडय़ातील आपली भ्रमंती सुरू होते. वाडय़ातील प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर प्रथम आपल्याला वाडय़ाचे पुढचे अंगण लागते. नारळ, फणस, रामफळ, सीताफळ, आंबा, पेरू, आवळा अशा विविध झाडांच्या सावलीत बहरलेले हे अंगण पाहून आपण सुखावतो. पुढच्या अंगणातून दोन पायऱ्या वर चढल्यानंतर वाडय़ाच्या ओटीचा भाग आपल्या नजरेस पडतो. वाडय़ाच्या ओटीच्या या भागात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे देहेरकर कुटुंबीय सांगतात. ओटीच्या या भागात कोनाडे, खुंटय़ा, भिंतीवरील नक्षीकाम पाहायला मिळते. ओटीतून माजघराकडे जाण्यासाठी (जुन्या पद्धतीचा) उंबराच्या लाकडातून साकारलेला दरवाजा आहे. या दरवाजातून आत आल्यानंतर माजघराचा भाग लागतो. वाडय़ातील माजघराच्या भागात काळानुरूप अनेक बदल झाल्याचे आपल्याला जाणवते. वाडय़ातील माजघरात लाकडी फर्निचर, टी.व्ही., फरशा आदी आधुनिक गोष्टी पाहायला मिळतात. माजघराच्या एका कोपऱ्यात एक खोली आपल्या निदर्शनास पडते. ती खोली म्हणजे बाळंतिणीची खोली. या खोलीचा आता देहेरकर कुटुंबीय इतर दैनंदिन कामासाठी वापर करतात. त्याचप्रमाणे माजघराच्याच भागात देवघरही पाहायला मिळते. आजच्या आपल्या या ब्लॉक सिस्टीममध्ये जेमतेम स्वयंपाक करण्याइतकेच इवलेसे स्वयंपाकघर असते; परंतु देहेरकर वाडय़ात पूर्वीच्या काळी तब्बल दोन स्वतंत्र स्वयंपाकघरे होती. त्यापैकी एक स्वयंपाकघर उपवासाचे पदार्थ करण्यासाठी तर दुसरे स्वयंपाकघर दैनंदिन स्वयंपाकासाठी वापरले जात असे. परंतु काळानुरूप प्रथा-परंपरा बदलल्या आणि वाडय़ात केवळ एकच स्वयंपाकघर शिल्लक राहिले. उपवासाच्या स्वयंपाकघराच्या जागेत भाडेकरू म्हणून ‘पाटील’ कुटुंब राहत आहे. वाडय़ाच्याच भागात धान्याची कोठारे होती. कोठारांच्या जागेत आज वाडय़ाचे स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरातून पुढे आल्यानंतर मागच्या पडवीचा भाग लागतो. मागच्या पडवीजवळ एक दरवाजा आहे. या दरवाजातून मागच्या अंगणात जायला प्रवेश आहे. वाडय़ाचे मागचे अंगण आजही शेणाने सारवलेले आहे. या अंगणात औदुंबराचे झाड, दत्ताचे देऊळ पाहायला मिळते.

कै. यशवंत देहेरकर यांनी सुरुवातीला ४० रुपयांना हा वाडा भाडेतत्त्वावर घेतला आणि त्यानंतर १९६१ मध्ये आठ हजार रुपयांना तो खरेदी केला. देहेरकर यांनी खरेदी करायच्या आधीपासूनच हा वाडा अस्तित्वात असून चौधरी, जुन्नरकर आणि चव्हाण आदी कुटुंबांचे वास्तव्य या वाडय़ात होते. चव्हाण कुटुंबीयांनी साधारण १८८० दशकाच्या सुमारास हा वाडा बांधला असावा. कै. यशवंत देहेरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात भूमिगत असताना त्यांनी हस्तकला शिकून घेतली. पुढे ही कला त्यांचे पुत्र मनोहर देहेरकर यांनीही अवगत केली. वाडय़ाच्या बाजूला हस्तकलेचा कारखाना पाहावयास मिळतो. देहेरकर यांनी आत्तापर्यंत मोठमोठय़ा मंदिरांतील मूर्तीवर हाताने नक्षीकाम केलेले आहे. दिल्ली, बंगळुरू, चैन्नई, हैदराबाद, त्रिवेंद्रम अशा विविध शहरांमध्ये त्यांनी साकारलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शनही झाले आहे. विशेष म्हणजे मुरबाड परिसरातील अनेक आदिवासी बांधवांना त्यांनी ही कला शिकवली आणि रोजगार उपलब्ध करून दिला. आजमितीला वाडय़ात मनोहर देहेरकर, त्यांची आई आशालता देहेरकर, पत्नी नयना देहेरकर, मुलगा हेरंब देहेरकर, पुतण्या चंदन देहेरकर आणि वहिनी शुभांगी देहेरकर वास्तव्यास आहेत. पूर्वीच्या काळी या वाडय़ात १८ भाडेकरूंचे वास्तव्य होते. सध्या वाडय़ात पाटील आणि केंजाळ ही दोन कुटुंबे भाडेकरू म्हणून सुखाने नांदत आहेत.