भाईंदर : आमदार गीता जैन यांनी कनिष्ठ अभियंत्यांना मारहाण केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आमदार जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दोन्ही अभियंत्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिले आहेत. तर या अभियंत्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी केली आहे. या प्रकरणात बुधवार संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मीरा रोडमधील पेणकर पाडा येथे असलेल्या एका बांधकामावर पालिकेच्या पथकाने मंगळवारी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार जैन यांनी कनिष्ठ अभियंता संजय सोनी आणि शुभम पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीमुळे जैन यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर या दोन्ही कनिष्ठ अभियंतांनी जैन यांच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. कर्तव्य बजावत असताना गीता जैन यांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर कनिष्ठ अभियंताकडून गैरवर्तन करण्यात आल्यामुळे त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र जैन यांनी पोलीस ठाण्यात दिले आहे.
तक्रारीनंतर कारवाई..
कनिष्ठ अभियंत्यांनी विकासकाच्या हितासाठी बांधकामावर कारवाई केली असल्याचा आरोप गीता जैन यांनी केला आहे. त्यामुळे गीता जैन यांनी याबाबत पुरावे दिल्यास अभियंत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सांगितले. पेणकर पाडय़ातील बांधकामाची तक्रार आल्यामुळेच कारवाई करण्यात आली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.
सखोल चौकशी
अभियंत्यांनी पत्र देऊनही बुधवार संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करम्ण्यात आला नव्हता. याबाबत काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणी सखोल चौकशी करत असून लवकरच यावर योग्य गुन्ह्याची नोंद केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांची टीका गीता जैन यांनी मारहाण केल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. बहुजन अभियंत्याला झालेली मारहाण सहन केली जाणार नाही, असा इशारा रमष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.