लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण जवळील उल्हास आणि काळु नदीच्या संगमावर अटाळी, वडवली भागात ६० एकर परिसरात घनदाट वनराई आहे. परिसरातील नागरिकांनी या वनराईचे संवर्धन केले आहे. या वनराईत विविध प्रकारची जैवविविधता पाहण्यास मिळते. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने या वनराईत पक्षी अभयारण्य उभारणीसाठी प्रयत्न करावा, अशी मागणी कल्याणमधील काळा तलाव भागाचे माजी नगरसेवक आणि निसर्गप्रेमी सुधीर बासरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

या पक्षी अभयारण्य उभारणीसाठी अटाळी, आंबिवली, वडवली परिसरातील ग्रामस्थ, महसूल, वन विभागाचे पालिका प्रशासनाने सहकार्य घेतले तर हा प्रकल्प विनाअडथळा लवकर मार्गी लागू शकतो, अशी सूचना माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला केली आहे. वडवली, अटाळी भागात उल्हास नदी आणि काळु नदीच्या संगमावर ६० एकर परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने जानेवारी ते मेपर्यंत या भागातील वनराई पाना फुलांमुळे टवटवीत असते. साठ ते सत्तर वर्षाची जुनाट झाडे या भागात आहेत. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, स्थलांतरित पक्षी यांचा कायमस्वरुपी या भागात अधिवास असतो. अनेक पक्षीप्रेमी, पक्षीप्रेमी छायाचित्रकार, पर्यावरणप्रेमी संस्था या भागात भ्रमंतीसाठी येतात. कल्याण परिसरातील शाळा विद्यार्थ्यांना निसर्गातील जैवविविधता अनुभवण्यासाठी कार्यानुभवाच्या तासात अटाळी वडवली भागातील घनदाट वनराईत घेऊन येतात.

या भागात कल्याण डोंबिवली पालिकेने मागील काही वर्षाच्या काळात ५० एकर भागात वनराई फुलवली आहे. सलग १०० एकर परिसरात वनराईचा हरित पट्टा कल्याण खाडी किनारा भागात आहे. कल्याण, टिटवाळा, आंबिवली, अटाळी भागातील नागरिक दररोज या भागात सकाळ, संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. या भागात अलीकडे मोरांचे नियमित दर्शन नागरिकांना होते. विविध प्रकारच्या पक्ष्यांचा सकाळ, संध्याकाळ कलकलाट या भागात असतो. याशिवाय कोल्हे, ससे, भेकर, रानडुक्कर, विविध प्रकारचे तितर, लावरी, होला असे रानपक्षी यांचाही याठिकाणी अधिवास आहे. हे घनदाट जंगल अधिक संरक्षित केले तर याठिकाणी चांगले पक्षी अभयारण्य उभे राहू शकते, अशी मागणी बासरे यांनी पालिकेकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १२५ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात टिटवाळा, शहाड कंपनी परिसर, डोंबिवली पश्चिमेत खाडी किनारा, ठाकुर्ली परिसरात जंगल शिल्लक आहे. उर्वरित भागात नवीन बांधकामे झाल्याने झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. शहराची फुप्फुसे म्हणून अटाळी, वडवली भागातील जंगल संरक्षित करून तेथे पक्षी अभयारण्य उभारणीसाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुधीर बासरे यांनी केली आहे. अनेक निसर्गप्रेमींनी या मागणीला पाठबळ दिले आहे.