लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवलीतील आयरे गाव, ज्योतीनगर झोपडपट्टीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या आयरे रेल्वे पुलाची देखभाल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या पुलाच्या छत आणि कठड्याचा काँक्रीटचा भाग निकृष्ट झाला आहे. पुलावरुन येजा करताना छताचा कमकुवत भाग कोसळला तर अपघात होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते.
दिवा-वसई रेल्वे मार्गावर आयरे गाव भागात उड्डाण पूल आहे. या पुलाखालून आयरे गाव, ज्योतीनगर झोपडपट्टी, आयरे तलाव भागात जाता येते. आयरे गाव पुलाच्या पलीकडील भागात नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे या पुलाखालून रिक्षा, खासगी वाहने यांची सतत वर्दळ असते. शाळकरी मुले याच भागातून येजा करतात.
हेही वाचा… विचारमंथन व्याख्यान: लोकमान्य टिळक हे आधुनिक इतिहासातील भारताचे नेते – डॉ. सदानंद मोरे
पुलावरुन रेल्वे वाहतूक सतत सुरू असते. या सततच्या दणक्याने पुलाला हादरे बसतात. काही वर्षापूर्वी बांधलेल्या या रेल्वे पुलाची देखभाल केली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आयरे गाव परिसरात अनेक बेकायदा चाळी, इमारती आहेत. भूमाफियांच्या अवजड वाहनांची या भागातून येजा असते. या पुलाचे नियोजन रेल्वेच्या अखत्यारित आहे. पालिका अधिकारी या विषयात हस्तक्षेप करत नाहीत. पालिकेच्या हद्दीत हा रेल्वे पूल असल्याने या पुलाच्या देखभालीविषयी प्रशासनाने रेल्वेला कळवावे, अशी मागणी आयरे परिसरातील नागरिकांची आहे.