ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गालगत म्हणजेच, ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या कोपरी आनंदनगर जकातनाका, मुलुंड येथील कचराभूमीवर कला केंद्र आणि रुग्णालय बनवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुलुंड येथील हरिओमनगर आणि कोपरी भागातील रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरूवात केली आहे. १० हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्याकाही दिवसांपासून धारावी पूनर्वसन प्रकल्पातील बाधितांना या जागेत घरे उपलब्ध करून देणार असल्याची चर्चा होती.
ठाणे आणि मुलुंडच्या वेशीवर आनंदनगर जकातनाका आहे. जकात बंद झाल्यापासून या जागेचा वापर होत नाही. अनेकदा रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले जकातनाक्याच्या भागात जात असतात. तर याच जकातनाक्याला लागून हरिओमनगर परिसरातील कचराभूमी आहे. येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून हा भूखंड रिकामा केला जात आहे. राज्य सरकार या मोकळ्या जागेत कोणता प्रकल्प राबविणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. या भागात धारावी पूनर्वसन प्रकल्पातील बाधितांना घरे देण्यात येणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. परंतु अधिकृतरित्या याबाबत स्पष्टता आलेली नाही. मुलुंडमधील काही सामाजिक संस्थांनी त्यास विरोध केला होता. तसेच धारावीतील रहिवाशी देखील मुलुंडमध्ये येण्यास तयार नाहीत. आता मुलुंड येथील हरिओम नगर भागातील रहिवाशांनी या भूखंडांवर कला केंद्र आणि रुग्णालय निर्माण व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.
हे ही वाचा…पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी
हरिओमनगर परिसरात २६ इमारती असून सुमारे ३५ हजार रहिवासी या भागात राहातात. ठाण्यातील कोपरी येथील बाराबंगला परिसरातही मोठी लोकवस्ती आहे. आनंदनगर जकातनाका हा पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडून आहे. येथे रुग्णालय उभारल्यास ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच येथे सुसज्ज असे बसगाड्यांसाठी आगार तयार होऊ शकते. या ठिकाणी बेस्ट, ठाणे महापालिकेच्या बसगाड्या प्रवाशांना उपलब्ध झाल्यास रेल्वे वाहतुकीवरील ताणही हलका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथील मागील दोन आठवड्यापासून स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरूवात केली आहे. या मागणीसाठी आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. येत्या काही दिवसांत १० हजार स्वाक्षरींचे पत्र घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे असे असे येथील रहिवासी मधूसूदन गुट्टी यांनी सांगितले.
हरिओमनगर येथील भूखंड लोकोपयोगी सुविधेसाठी निर्णाण करणे आवश्यक आहे. येथे आधुनिक बसगाडी आगार, रुग्णालय, आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र, सास्कृतिक- क्रीडा केंद्र तयार करता येऊ शकते. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेतली जात आहे. – साहेबराव सुरवाडे, अध्यक्ष, हरिओमनगर ॲपेक्स बाॅडी फेडरेशन (होनाफे).