ठाणे : महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकेदार मंडळी केवळ फार्स करून बिले उकळत असल्याने नालेसफाईत हातसफाई होत असल्याचा आरोप त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दुबार नालेसफाई करण्याबरोबरच विविध संस्थांना नाले दत्तक देण्याची योजना राबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारे लहान-मोठे नाले असे एकूण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. शहरात एकूण ३२५ नाले आहेत. त्यातील १३ मोठ्या नाल्यांना उर्वरित ३१२ नाले जोडण्यात आलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाले तुंबून आपातकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यात येतात. शहरातील नाल्यांसोबतच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख गटारांची सफाई करण्याचा निर्णय घेऊन या कामाच्या निविदा पालिका प्रशासनाने काढल्या आहेत. या कामांसाठी ९ कोटी ९६ लाख ९७ हजार ९४२ रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्याचे नियोजन करत ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत उरकण्याचे लक्ष्य पालिकेने ठरविले आहे.

हेही वाचा – आधारकार्ड बँकखात्यासोबत लिंक करण्याच्या बहाण्याने एकाची ४० हजार रुपयांना फसवणूक

विशेष म्हणजे, यंदा नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण, छायाचित्र काढण्याबरोबरच ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. ड्रोनद्वारे नालेसफाईआधी आणि सफाईनंतरच्या कामांचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यात नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारावर प्रत्येक ठिकाणानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यामुळे यंदा ठाण्यातील नालेसफाईवर ड्रोनची नजर राहणार असल्याचे चित्र आहे. परंतु नालेसफाई योग्य प्रकारे होत नसल्यामुळे अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून यामुळेच नालेसफाईच्या कामांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. असे असतानाच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनीही नालेसफाईत हातसफाई होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हेही वाच – कल्याण-डोंबिवलीत केंद्र चालकांकडून आधार यंत्र भाड्याने देण्याचे प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकेदार मंडळी केवळ फार्स करून बिले उकळतात. यावर अंकुश बसावा म्हणून नालेसफाईसाठी जी एकत्रित रक्कम असेल ती विभागून पावसाळ्याआधी नालेसफाई करण्याबरोबरच पुन्हा चार-पाच महिन्यांनी दुबार नालेसफाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी आयुक्तांनी मान्य केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, योग्य पद्धतीने नालेसफाई करण्यासाठी एका विकासकाने पुढाकार घेतला आहे. त्याचे मॉडेल लवकरच पालिकेला सादर केले जाणार आहे. याच धर्तीवर नाले दत्तक घ्यावेत असे सांगून आमच्या संस्थेमार्फत एक नाला दत्तक घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of bjp mla sanjay kelkar on drains ssb
Show comments