ठाणे : दिवा रेल्वे स्थानकातून दिवा ते सीएसएमटी ही उपनगरीय रेल्वेगाडी सुरू व्हावी या मागणीसाठी बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून येथील नागरिक दिवा स्थानकातून रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी करत आहेत. स्वाक्षरी मोहिमेस दिवेकरांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. स्वाक्षऱ्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून दिवा शहरात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पूर्वी दिवा रेल्वे स्थानकात धिम्या रेल्वेगाड्यांची वाहतूक होत होती. प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने येथे जलद रेल्वेगाड्या थांबण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या रेल्वेगाड्या कर्जत, कसारा भागातून येणाऱ्या आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्या तेथूनच भरून येत असतात. या गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रवेश मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवा स्थानकातून जलद रेल्वेगाड्यांचा प्रवाशांना उपयोग नसल्याचे दिसून येत आहे. या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी दोन महिलांनी गाडी अडवून आंदोलन केले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दिव्यातील प्रवाशांकडून दिवा -सीएसएमटी रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. दिव्यातील संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षऱ्यांची प्रत रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.
हेही वाचा – भाईंदर : नव्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे पडल्याने आता नव्याने काम सुरू
दिवा स्थानकातून रेल्वेगाड्या सुटाव्या यासाठी होम फलाट उपलब्ध आहे. मोहिमेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. सुमारे १५ हजार प्रवाशांनी स्वाक्षऱ्या करून रेलवेविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. या मोहिमेतूनही मार्ग निघाला नाही तर रेल्वे रुळांवर उतरू. – विजय भोईर, अध्यक्ष, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना.