लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील पाच ते सहा वर्षापासून तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण न करताच आयुक्तांची उचलबांगडी केली जाते. एखादा नवीन आयुक्त येऊन त्यांनी आपली पालिकेत विकास कामे मार्गी लावण्याची, प्रशासनाला शिस्त लावण्याची घडी बसविण्यास सुरूवात करताच त्यांची उचलबांगडी करून काही राजकीय मंडळी पालिका प्रशासनासह या शहरांना विकास कामांपासून दूर लोटत आहेत.

उकिरडा म्हणून शिक्का बसलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेत करड्या शिस्तीच्या ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना आयुक्तपदी नियुक्त करावे, अशी जोरदार मागणी कल्याण डोंबिवली शहरातील सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे, ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मागील १७ महिन्यांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली प्रशासनात शिस्त आणून नेहमीच्या प्रशासकीय बेशिस्तीला लगाम घातला होता. नागरिकांची कामे मार्गी लावण्यावर त्यांचा विशेष भर होता. मागील दीड वर्षाच्या कालावधीत आयुक्त डॉ. जाखड यांनी प्रशासनावर आपली हुकमत बसवली होती. अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कठोर शिस्तीच्या कार्यपध्दतीला वचकून होते. हळुहळू प्रशासन, विकासकामे गतिमान करण्यासाठी आयुक्त डॉ. जाखड प्रयत्नशील असतानाच, अचानक शासनाने त्यांची पालघर येथे बदली केल्याने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी, या शहरांमधील बेसुमार बेकायदा बांधकामे, प्रशासनातील बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्याधिकारी संवर्गातील पदनिर्देशित (प्रमोटी) आयुक्ताला कल्याण डोंबिवली पालिकेत पाठवू नये. या दोन्ही शहराचे होत असलेले वाट्टोळे रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याला किमान तीन वर्षासाठी कल्याण डोंबिवली पालिकेत नियुक्त करावे, अशी मागणी येथील राजकीय पदाधिकारी नोवेल साळवे, रुपेश भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टी. चंद्रशेखर, यु. पी. एस. मदान, श्रीकांत सिंग यांसारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमुळे मागील २५ वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेत निधीची उपलब्धता नसताना अनेक महत्वाची विकास कामे मार्गी लागली. पाच वर्षापूर्वी ई. रवींद्रन, पी. वेलरासू हे ज्येष्ठ सनदी अधिकारी पालिकेत आयुक्त म्हणून आले होते. राजकीय रोषामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना अल्पावधीत पालिकेतून जावे लागले.

मुंबई, ठाणेसह इतर शहरे रस्ते, इतर विकास कामांनी सुस्थितीत, आखीवरेखीव होत असताना, कल्याण डोंबिवली शहरे अद्याप कचराभूमीवर बसल्यासारखी आहेत. विकास कामे नाहीच, उलट या विकासाची वाट्टोळे करणारी बेसुमार बेकायदा बांधकामे या शहरांना बदनाम करत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी या ऐतिहासिक, सांस्कृतिक शहरांना नावलौकिक मिळण्यासाठी कठोर शिस्तीचा आयएएस अधिकारी शासनाने येथे नियुक्त करावा. -ॲड. मंगेश कुसुरकर, वकील, डोंबिवली.