अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागातील वनपट्टा संरक्षित करण्याची मागणी
अर्निबध वृक्षतोड आणि अतिक्रमणे यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील बरीचशी वने आता उजाड झाली असली तरी अजूनही काही ठिकाणी काँक्रीटच्या विळख्यातही जंगलांनी आपले हिरवे अस्तित्व जपले आहे. अंबरनाथ पूर्व विभागातील वडवलीमध्ये असाच एक हिरवा पट्टा अद्याप शिल्लक आहे. वन विभागाने तातडीने त्याचे संवर्धन करून ही हिरवी श्रीमंती अंबरनाथकरांना उद्यान म्हणून उपलब्ध करून द्यावी, असा पर्यावरणप्रेमींचा आग्रह आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांत फार मोठे वनक्षेत्र आहे. मात्र वाढते काँक्रीटीकरण आणि वृक्षतोडीमुळे त्यातील बरेचसे आता उजाड झाले आहे. मात्र सुदैवाने अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या वडवलीमध्ये जंगलाचा एक तुकडा अद्याप शिल्लक आहे. रोटरी सभागृहाच्या मागे असलेल्या या जंगलावरही आता हळूहळू अतिक्रमण सुरू झाले आहे. या परिसरातील माती उत्खनन करून नेली जात आहे. काही झाडेही तोडण्यात आली आहेत. मात्र तरीही अद्याप येथे
शेकडो वृक्ष टिकून आहेत. अंबरनाथ शहरात सध्या एकही चांगले उद्यान अथवा बाग नाही. त्यामुळे ‘शतकोटी’ वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष संवर्धन करणाऱ्या वन विभागाने तातडीने हे उरलेसुरले जंगल संरक्षित करून अंबरनाथकरांना एक चांगले उद्यान द्यावे, अशी येथील पर्यावरणप्रेमी नागरिकांची इच्छा आहे. मुंबई-ठाणे परिसरांतील कोणत्याही शहरात मध्यवर्ती ठिकाणी असे जंगल नाही. केवळ सुदैवाने हे जंगल अद्याप टिकले आहे. या जंगलाच्या एका बाजूला नाला आणि एक गृहसंकुल आहे. दुसऱ्या दिशेला रोटरी सभागृह आहे. इतर दोन दिशांना रस्ते आहेत. आश्चर्य म्हणजे मालकीची इतकी मोठी जागा असूनही वन विभागाचा एक साधा फलकही इथे नाही. किमान आता तरी उजाड होण्याची वाट न पाहता वन विभागाने ही जागा तातडीने ताब्यात घ्यावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
अंबरनाथ येथील वडवली विभागात वन खात्याची तब्बल अडीच एकर जागा आहे. सुदैवाने त्या जागेवर फारसे अतिक्रमण झालेले नाही. तसेच वृक्षसंपदाही टिकून आहे. त्यामुळे पालिका प्रशासन अथवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेसोबत करार करून ही जागा अंबरनाथकरांसाठी एक उद्यान म्हणून देता येऊ शकेल.
– डॉ. चंद्रकांत शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी, अंबरनाथ तालुका
अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागात शेकडो वृक्षसंपदा असलेला जंगलाचा पट्टा टिकणे हे नागरिकांचे सुदैव आहे. वन विभागाची तयारी असेल तर संयुक्त विद्यमाने येथे नक्षत्र वन विकसित करण्यास पालिका प्रशासनाची तयारी आहे. सर्वसाधारण सभेत तसा ठराव करून हा प्रकल्प मार्गी लावता येईल.
– गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ पालिका