नगरविकासात कल्याण शहर विस्तारले. मात्र विस्तारलेल्या या शहरातील काही भागात जाण्यासाठी रात्री दहानंतर कोणतीही परिवहन व्यवस्था नाही. गंधारे, बारावे, सापर्डे आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरून कोणतीही व्यवस्था नसते. अगदी रिक्षा मिळण्याचीही मारामार असते. एखादी रिक्षा मिळाली तरी रिक्षाचालक वाढीव भाडे सांगत असल्याने प्रवाशांची पंचाईत होते.नव्याने विकसित झालेल्या या भागांसाठी केडीएमटीने रात्रीच्या वेळेत मिनी बस सुरू कराव्यात, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.कल्याण पश्चिमेला सापर्डे, गंधारे, बारावे, खडकपाडा, वसंत व्हॅली, मोहने, आंबिवली परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या भागातील मोकळ्या वातावरणाला भुलून मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर भागातील कुटुंबे येथे राहण्यासाठी आली आहेत. या भागातील बहुतेक लोक मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी जातात. सकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी या प्रवाशांना घराजवळून रिक्षा मिळते, परंतु रात्रीच्या वेळेत संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत या भागात जाण्यासाठी सहज रिक्षा उपलब्ध होते. रात्री नऊ वाजल्यानंतर या नवीन विकसित भागात येण्यासाठी रिक्षाचालक तयार नसतात. प्रवासी या भागात घेऊन गेल्यानंतर परतीच्या प्रवासात रात्रीच्या वेळेत भाडेकरू मिळत नाहीत, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.थेट प्रवासाचे भाडे चाळीस ते साठ रुपये असल्याने प्रवासी तेवढे भाडे देण्यास तयार नसतात. रोजच्या प्रवासासाठी एवढे भाडे कोण देणार, असा प्रवाशांचा प्रश्न आहे.
कल्याण पूर्व, पश्चिम भागात विकसित झालेल्या नवीन गृहसंकुलांतील रहिवाशांच्या सोयीसाठी केडीएमटीने या भागात रात्रीच्या वेळेत मिनी बस चालवल्या तर परिवहन उपक्रमाला महसूल मिळेल आणि प्रवाशांची सोय होईल, असे प्रवाशांनी सांगितले.
रिक्षाचालक सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी वाहतूक करीत असतो. काही रिक्षाचालक दिवसा, रात्रपाळी पद्धतीने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानक भागात सतत रिक्षा उपलब्ध असतात. दिवसभर व्यवसाय केल्याने रिक्षाचालक रात्रीच्या वेळेत आरामासाठी घरी जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळेत रिक्षांचे प्रमाण कमी असते. नवीन विकसित झालेल्या भागात जाण्यासाठी काही रिक्षाचालक असतात. याशिवाय प्रीपेड रिक्षेची सोय प्रवाशांसाठी करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेण्यात यावा.
– प्रकाश पेणकर, अध्यक्ष, रिक्षा संघटना
शहराअंतर्गत विकसित झालेल्या नवीन भागात केडीएमटीची बससेवा सुरू आहे. या शिवाय भागातील बसची वारंवारिता, बसच्या फेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन वाहक, चालक भरती झाले की रेल्वे स्थानक भागातून विविध भागांतील बस सेवा उपलब्ध होईल.
– नितीन पाटील, सभापती, परिवहन समिती