उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील वीज वितरण यंत्रणा जुनाट आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे बिघाड झाल्यास त्यात मोठा वेळ खर्ची जातो. सर्वाधिक दाटीवाटीच्या उल्हासनगरसारख्या शहरात ही यंत्रणा भूमिगत होण्याची मागणी आता पूर्ण झाली असून केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) या कामासाठी १६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम लवकरच पू्र्ण केले जाईल. मात्र शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार आणि रस्त्यांच्या कामामुळे आधीच रस्ते खोदकामाला त्रासलेल्या नागरिकांच्या त्रासात यामुळे भर पडण्याची भीती आहे.
लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या शहरांमध्ये उल्हासनगर या व्यापारी शहराचा क्रमांक लागतो. शहरातील सुमारे ६१ टक्के जागा व्यवसाय, आस्थापने, दुकाने, लहान मोठे कारखाने यांनी व्यापले आहेत. त्यात शहरात दररोज लाखो ग्राहक, व्यापारी येजा करत असतात. शहरातील अनेक रस्ते अरूंद असून रहिवासी क्षेत्रही दाटीवाटीचे आहे. यातून मार्ग काढत शहरात वीज आणि पाण्याचे वितरण केले जाते. यातील विद्युत वितरण यंत्रणा जुनी आणि गुंतागुतींची आहे. या गुंतागुंतीच्या यंत्रणेला सुरळीत करण्यासाठी स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी भूमीगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेच्या माध्यमातून उल्हासनगर शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी १६ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून १७ ठिकाणी भूमीगत वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे या भागात विद्युत वितरण व्यवस्थेला आता निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील, अशी आशा आहे. नुकतीच आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात महावितरण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या कामासाठीची तांत्रिक प्रक्रिया, महापालिकेकडून आवश्यक परवानग्या आणि कामाचे नियोजन यावर चर्चा झाली.
हेही वाचा…कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत
प्रस्तावीत मार्ग
स्वामी सत्यनारायण ते वुडलँड कॉम्प्लेक्स, गोल मैदान ते जय भवानी टॉवर, फॉलोवर चौक ते सेंट्रल हॉस्पिटल, शहाड पूल ते गुलशन नगर, १७ सेक्शन ते लुल्ला इन्शुरन्स, शिवलोक बॅरेक ते शिवलोक अपार्टमेंट, महापालिका ते फीडर वन, प्रवीण हॉटेल ते राजीव गांधी चौक यांसारख्या भागांमध्येही भूमिगत केबल टाकली जाणार आहे.
पुन्हा खोदकाम
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खोदकाम सुरू आहे. यात भुयारी गटार, रस्ते कामाचा समावेश आहे. त्यामुळे भूमीगत वाहिन्यांची योजना चांगली असली तरी आणखी किती काळ खोदकामात राहायचे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र त्या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवस्थापन केल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.