हृषीकेश मुळे
कळवा, रेतीबंदर, खारेगावात ढीग; चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धुळीचे लोट
कळवा खाडीकिनारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करीत येथील चौपाटीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या ठाणे महापालिकेचे याच भागात टाकल्या जाणाऱ्या राडारोडय़ाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. बांधकाम कचऱ्याची शेकडो अवजड वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत रोज रिती केली जात आहेत. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कळवा चौपाटी ते खारेगाव टोल नाका या मार्गावर धुळीचे लोट उडू लागले आहेत. कांदळवनांनादेखील याचा फटका बसू लागला आहे.
कळवा-मुंब्रा खाडीकिनारी कोटय़वधी रुपये खर्च करून चौपाटी प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढणार असून त्यावर डोळा ठेवून अनेक अनधिकृत उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. एकीकडे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसरीकडे नियोजित चौपाटीपासून काही अंतरावर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना टाकल्या जाणाऱ्या राडारोडय़ाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होऊ लागली आहे आणि रस्त्याच्या सौंदर्यालाही गालबोट लागले आहे.
पूर्वी अशा प्रकारे खारेगाव टोल नाक्यापासून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या नाशिक महामार्गावर बांधकाम कचरा टाकला जात असे. तिथे भराव टाकून खाडी बुजवून गोदामे व हॉटेल उभारण्यात आली आहेत.
तसाच काहीसा प्रकार रेतीबंदर ते खारेगाव टोल नाक्याच्या परिसरात घडू लागला आहे. या मार्गावरून मुंब्रा, शीळ फाटा, कल्याण, नवी मुंबईच्या दिशेने अनेक अवजड वाहने जातात. रात्री मालवाहू वाहनांची संख्या जास्त असते. या परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यांचाच बांधकाम कचरा रेतीबंदर, खारेगाव परिसरात टाकला जात आहे.
राडारोडा माफिया सक्रिय?
* मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ भागात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. तेथील राडारोडय़ाची विल्हेवाट लावणारी मोठी टोळी गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी भागातील खाडीकिनारी राडारोडा टाकून ही टोळी प्रति फेरी हजारो रुपये कमावत असल्याचे सांगितले जाते.
* स्थानिक प्रशासकीय यंत्रणांच्या परवानगीशिवाय हे उद्योग केले जात असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेने मध्यंतरी शोधपथकेही तयार केली होती. जिल्हा प्रशासनही भराव थांबविला जाईल अशी घोषणा करीत असते, प्रत्यक्षात मात्र उलटेच चित्र दिसते.
सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय
रस्त्यालगत राडारोडा टाकण्याचे काम रात्री अंधारात केले जाते. त्याला चाप बसवण्यासाठी आता ठाणे महापालिका या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे राडारोडा टाकणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती आम्हाला नुकतीच मिळाली आहे. मालवाहू वाहने सामान्यपणे मध्यरात्री राडारोडा टाकून निघून जातात, मात्र या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मार्गावर सीसीटीव्ही लावण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल.
– अनिल पाटील, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका