लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील विभागीय मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणारे लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य नागरिकांच्या तक्रारी, नागरी समस्या, अडचणी यांचा तात्काळ निपटारा व्हावा म्हणून शासन आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात, विभागीय उपायुक्त कार्यालयात अनेक वर्षापासून नागरिकांच्या सोयीसाठी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित केले जातात. मंगळवारी आयुक्तांच्या दालनात लोकशाही दिन आयोजित केला जात होता. पालिका हद्दीतील सुमारे १५० हून अधिक तक्रारदार नागरिक या लोकशाही दिन कार्यक्रमाला उपस्थित राहत होते.
आणखी वाचा-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत
आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत साहाय्यक आयुक्त, अभियंते यांच्या समोर संबंधित प्रभागातील नागरिकाच्या तक्रारीचा निपटारा केला जात होता. पालिकेत अनेक महिने आणि वेळा हेलपाटे मारुनही आपल्या तक्रारीचे निराकरण होत नसल्याने तक्रारदार नागरिक त्रस्त होते. परंतु, लोकशाही दिन कार्यक्रमात आयुक्तांच्या समोर तक्रारीचे निराकरण झाल्याने तक्रारदार नागरिक समाधान व्यक्त करतात.
आचारसंहितेमुळे रद्द झालेले लोकशाही दिन कार्यक्रम विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे २६ नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.