लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा-मांडा परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील नवनियुक्त साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदभार स्वीकारताच जोरदार मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी टिटवाळा गणेशवाडी परिसरातील पंधराहून अधिक चाळी बांधण्यासाठीचे जोते तोडकाम पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले.
टिटवाळा-मांडा, बल्याणी, उंबार्णी, आंबिवली, बल्याणी टेकडी भागात बेसुमार बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू असल्याच्या वाढत्या तक्रारी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त यांच्याकडे नागरिकांकडून येत होत्या. या चाळींमध्ये समाजकंटक, बांग्लादेशी घुसखोर यांचा रहिवास होण्याची शक्यता विचारात घेऊन या बेकायदा चाळींवर कारवाई करण्यासाठी जागरूक नागरिक आग्रही होते. या बेकायदा चाळींवर कारवाई करण्यासाठी आयुक्त डॉ. जाखड यांनी तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना आदेश दिले होते. अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांनीही रोकडे याना बेकायदा बांधकामांवर आक्रमक कारवाई करा असे वेळोवेळी सूचित केले होते.
साहाय्यक आयुक्त रोकडे कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याने आयुक्त डॉ. जाखड साहाय्यक आयुक्त रोकडे यांच्या संथगती कामाविषयी नाराज होत्या. रोकडे यांच्याकडून टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता नसल्याने अखेर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी रोकडे यांना अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त पदावरून तडकाफडकी हटवून तेथे प्रमोद पाटील यांची साहाय्यक आयुक्त पदावर वर्णी लावली. साहाय्यक आयुक्त पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी टिटवाळा, मांडा भागातील गणेशवाडी परिसरातील पंधराहून अधिक बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेली दगडी जोती जेसीबी, कामगारांच्या साहाय्याने तोडून टाकली.
टिटवाळा परिसरात उभ्या राहिलेल्या एकाही बेकायदा इमारतीवर मागील तीन वर्षाच्या काळात कारवाई झालेली नाही. साहाय्यक आयुक्त पाटील हे कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते टिटवाळा परिसरातील बेकायदा चाळी भुईसपाट करतील, असा विश्वास नागरिकांनाही आहे. त्याची चुणूक पहिल्याच दिवशी पाटील यांनी बेकायदा चाळींचे जोते भुईसपाट करून दाखवली आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई, मालमत्ता कर वसुलीचे आव्हान साहाय्यक आयुक्त पाटील यांच्यासमोर असणार आहे.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या निर्देशाप्रमाणे टिटवाळा-मांडा परिसरातील बेकायदा इमारती, चाळी, व्यापारी गाळे येत्या काही दिवसात नियोजन करून भुईसपाट करण्यात येतील. जी बांधकामे यापूर्वीच अनधिकृत घोषित करण्यात आली आहेत. ती पहिले तोडली जातील. सरकारी, पालिका आरक्षित जमिनींवरील बेकायदा चाळी, इमारती भुईसपाट केल्या जातील. -प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.