डोंबिवली : डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ व्दारका हाॅटेलची इमारत तोडण्याचे काम खासगी तोडकाम पथकाकडून सुरू करण्यात आले आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हे तोडकाम दिवसाढवळ्या करण्यात येत असल्याने डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर वाहन कोंडीत अडकत आहे. रविवारी दुपारी कोपर पुलावर एक बस बंद पडली. त्यामुळे पश्चिम रेल्वे स्थानक परिसर दोन तास कोंडीत अडकला होता.
रामनवमी, हनुमान जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर डोंंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात द्वारका हाॅटेलसमोरील रस्त्याची एक बाजू बंद करून जुनी इमारत तोडण्याचे काम तोडकाम पथकाने सुरू केले आहे. या रस्त्याच्या समोरच्या मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावतात. त्यामुळे शनिवार, रविवार व्दारका हाॅटेल समोरील रस्ता कोंडीत अडकत आहे. या कोंडीमुळे प्रवासी त्रस्त आहेत.
इमारत तोडकाम करणाऱ्या खासगी व्यावसायिकाने पालिका, पोलिसांच्या परवानगीने हे काम सुरू केले आहे. वाहतूक विभागाकडे यासंदर्भातचा अर्ज व्यावसायिकाने दिला आहे. आतापर्यंत डोंबिवलीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरची जुनी इमारत पुनर्विकासासाठी तोडण्याचे काम रात्री दहा वाजल्यानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत केले जाते. तशाच पध्दतीने पालिका, पोलीस, वाहतूक विभाग तोडकाम व्यावसायिकाला परवानग्या देतात. मग द्वारका हाॅटेलची इमारत तोडण्यासाठी या नियमाचे पालन का केले जात नाही, असे प्रश्न कोंडीत अडकणारे प्रवासी करत आहेत. या भागात कोंडी होऊ नये म्हणून खासगी तोडकाम व्यावसायिकाने याठिकाणी वाहतूक पोलिसांबरोबर खासगी व्यक्ति वाहतूक नियोजनासाठी तैनात ठेवल्या आहेत.
दिनदयाळ रस्ता, महात्मा गांधी रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, सुभाषचंद्र बोस रस्ता, मोठागाव, माणकोली पुलाकडून येणारी सर्व वाहने द्वारका हाॅटेलसमोरील रस्त्यावरून कोपर पूल दिशेने धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर इमारत तोडण्याचे काम रस्त्याची एका मार्गिका बंद करून सुरू असल्याने या भागात कोंडी होत असल्याच्या तक्रारी रिक्षा चालकांनी केल्या. हे काम रात्रीच्या वेळेत करावे, अशी सूचना पोलीस, वाहतूक पोलिसांना संबंधितांना करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
रविवारी दुपारी कोपर उड्डाण पुलावर एक बस बंद पडली. कोपर पुलावर आणि या पुलाच्या दोन्ही बाजुच्या रस्त्यावर दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस, सेवक, तोडकाम पथकाचे खासगी व्यक्ति ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते.सोमवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, या रस्त्यावरील गर्दी विचारात घेऊन हे तोडकाम थांबविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.