राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, ठाण्यातील शिंदे समर्थकांनी आज (गुरुवार) शहरात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र अचानकपणे रात्री उशिरा शिवसैनिक आणि समर्थकांना काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे संदेश वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवरून पाठविले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे ‘मातोश्री’ला भेट, तर दुसरीकडे शिंदेंना फोन; ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची धावाधाव

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे हे ओळखले जातात. एरवी जिल्ह्यात झालेल्या बंदनंतर शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. पण, शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमधून अद्यापही प्रतिक्रिया उमटलेली नाही. या उलट शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे समर्थक असल्याचे फलक लावले आहेत. अनेक शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवरून शिंदे समर्थक असल्याचे संदेश देण्यास सुरुवात केली आहे.

रात्री उशीरा अचानकपणे काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम रद्द –

असे असतानाच बुधवारी सायंकाळी शिवसेनेच्या काही शाखाप्रमुख तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकाना संदेश पाठविण्यात आले. त्यात लुईसवाडी येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी समर्थकांनी केली होती. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र रात्री उशीरा अचानकपणे काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे संदेश समाज माध्यमांवरून पाठविण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंधू व माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या नावाने हे संदेश पाठविण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstration of eknath shinde supporters in thane canceled msr