‘मॅजेस्टिक आमदार निवास’ ही मुंबईतल्या रीगल सिनेमाच्या चौकातली इमारत प्रसिद्ध आहे. तिचं मूळ प्रवेशद्वार जिथं होतं, तिथं (आता एका खासगी कंपनीच्या घशात गेलेलं) ‘सहकारी भांडार’ आहे.. या मूळ प्रवेशद्वाराच्या बरोब्बर समोर- रस्ता ओलांडल्यावरच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराशीदेखील आता पानवाला आहे. त्याला ओलांडून आत गेलात की, उजव्या हाताला पार्किंगची शेड आणि डाव्या हाताचं पहिलंच दार.. नीट पाहिल्यास ‘क्लार्क हाऊस’ ही अक्षरं मराठी, इंग्रजी आदी भाषांमध्ये दिसतील. या दाराआड मुंबईतल्या इतर सर्व आर्ट गॅलऱ्यांपेक्षा निराळंच असं एक प्रदर्शनस्थळ आहे. इथं दर्जेदार प्रदर्शन भरतात, असा बोलबाला आहेच. केवळ चित्रांच्या खरेदी-विक्रीची ही जागा नसून, इथं येणारी माणसं आजच्या (समकालीन) कलेबद्दल गप्पा मारत असतात, ‘क्लार्क हाऊस’शी जोडले गेलेल्या एखाद्या चित्रकार/ चित्रकर्तीची हालहवाल विचारत असतात.. ‘रंगकर्मी किंवा लेखक-कवी यांनीही इथं यायला हवं’ अशी इच्छा बाळगत असतात.. शिवाय प्रदर्शनांसाठी चार खोल्या (दोन वर, दोन खाली) आहेतच!
..अशा जागेपैकी तीन खोल्यांमध्ये सचिन बोंडे याचं ताजं प्रदर्शन भरलं आहे. खनिज तेल किंवा इंधन तेल- किंवा सर्वच पेट्रोलियम पदार्थ- यातून जगाचं राजकारण घडत गेलं आहे, ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना. हे राजकारण कसंकसं घडत गेलं, याचा तेल नावाचा इतिहास सांगणारी पुस्तकं आहेतच. तेलाचं राजकारण हा रोजच्या जगण्याचा भाग असल्यामुळे त्याची थोडीफार कल्पना सामान्यजनांनाही असतेच. सचिन बोंडेनं या प्रदर्शनातून ‘माहिती’ अजिबात दिलेली नाही. फार तर, एखाद्या मांडणशिल्पात त्यानं ‘इंधन तेलाची मागणी’ या आलेखातल्या एखाद्या रेघेचा वापर (संदर्भ न देता) केलेला दिसेल, पण तो अपवाद वगळता अन्य कलाकृतींमध्ये, या इंधन व्यवसायाकडे आणि त्यातून होणाऱ्या युद्धांकडे दृश्य-संवेदनांतून कसं पाहणार, याचा विचार सचिननं केला आहे. सामान्यजनांच्या रोजच्या वापरातलं ‘घासलेट’ आणि त्याचे दिवे वा कंदील, जगाचा नकाशा, त्यावर तेलाचे डाग किंवा शेल्फवर मांडलेल्या अत्तरांसारख्या छानशा कुप्यांमध्ये निरनिराळी इंधन तेलं.. उंट (अरब देश) आणि हत्ती (आसाम) हे तेल सापडणाऱ्या प्रदेशांतले प्राणी.. बुद्धिबळाचा पट आणि त्यावरले शह-काटशह.. आणि थेट इराकयुद्धात वगैरे वापरली गेलेली विमानं – अशा प्रतिमा सचिन बोंडे वापरतो. जगाच्या नकाशातले एकेक देशाचे नकाशे पुन्हा एका खोलीच्या सर्व भिंतींवर येतात. या भिंतींवर तेलाची नरसाळी आहेत, त्यांतून डांबसारखा द्रव आत गेला तरी बाहेर सोनंच निघतंय.. आणि याच खोलीच्या मधोमध अमेरिकेच्या गरुडानं झडप घालून ताब्यात घेतलेलं सर्वात मोठ्ठं तेलाचं मापही आहे. मूळचा यवतमाळचा सचिन हा मुंबईच्या ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये मुद्राचित्रण शिकला असल्याने त्याच्या बऱ्याच कलाकृती मुद्राचित्रणाच्या विविध तंत्रांचा वापर करतात. उदाहरणार्थ- त्या गरुडाच्या चित्रात ‘वूडकट’ आहे आणि तेलाच्या मापावर ‘एचिंग’देखील आहे.
सचिन बोंडे हा तेलाबद्दल तुम्हालाच जी काही माहिती आहे, तिच्या आधारे तुम्हाला विचार करायला लावतो! त्यानं प्रतिमा वापरल्या आहेत, त्यांचा संबंधही जोडून दाखवला आहे. तेलाबद्दल विचार करण्याची दृश्य-भाषा त्यानं शोधायचा प्रयत्न केला आहे. एखाद्या ‘प्रयत्ना’बद्दल एरवी यशस्वी की अयशस्वी असा प्रश्न असू शकतो, तो इथं या प्रदर्शनाबद्दल नाहीच.. कारण, तेलाबद्दल आपण सारे या ना त्या प्रकारे विचार करत असतोच! तो कसा, याचा दृश्यातून उलगडा सचिन बोंडेनं केला आहे. हे प्रदर्शन १६ मेपर्यंत खुलं आहे.
माहिती हवीय? पण कशी पाहाल?
‘माहिती दृश्यरूपात देणे’ म्हणजे काय? याचा चांगला नमुना ठरावं असं प्रदर्शन म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’लगतच्या मॅक्समुल्लर भवनात भरलेलं – ‘दिवंगत वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अपूर्ण (न बांधलेले) प्रकल्प’ अशा नावाचं प्रदर्शन! त्यात बघण्यासारखं आणि वाचण्यासारखं खूप काही आहे. मोठय़ा कंसाच्या आकाराची भिंत उभारून, त्यावर सनावळय़ांप्रमाणे चार्ल्स कोरिया यांनी बांधलेल्या इमारतींचाही तपशील सुयोग्यरीत्या दिला आहे. दालनभर टेबलं आणि त्यापुढे बसण्याची व्यवस्था आहे. टेबलांवर एकेका तीन-चार पानी फोल्डरात कोरिया यांच्या अपूर्ण वास्तुरचनांची आरेखनं (ड्रॉइंग्ज) आणि आराखडे (प्लॅन) पाहाता येतात.
आर्किटेक्चर शिकणारे विद्यार्थी किंवा त्या क्षेत्राबद्दल आस्था असणारे तर हे प्रदर्शन पाहातीलच; पण जरी या कशातच रस नसेल, तरीही ‘माहिती कशी दाखवतात’ याचा अनुभव घेण्यासाठी तरी हे प्रदर्शन नक्की पाहा! कंसाकार भिंतीच्या अखेरच्या भागामागे बारा-पंधरा जण बसू शकतील इतक्या जागेत, चार्ल्स कोरिया यांच्याबद्दलचे लघुपटही दाखवले जातात, त्यामुळे तर वास्तुरचनांकडे रसिकपणे कसं पाहायचं याची जाणही वाढेल. हे प्रदर्शन १४ मेपर्यंत सुरू आहे.
‘दुर्गम’ शाळांच्या भिंती
कुलाब्याला ‘ताजमहाल हॉटेल’च्या मागल्या बाजूच्या ‘मेरीवेदर रोड’वर ‘सन्नी हाऊस’ नावाची एक दोनमजली इमारत आहे.. तिच्या पहिल्या मजल्यावर ‘गॅलरी मीरचंदानी-स्टाइनऱ्यूक’ हे कलादालन आहे. बंद दाराची बेल वाजवून मगच इथं प्रवेश मिळत असला, तरी आतली प्रदर्शनं पाहून कुणालाही मनमोकळं वाटावं! इथंच सध्या गौरी गिल यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. वारली चित्रकार राजेश वांगड (वनगड) यांची चित्रं स्वत:च्या फोटोंच्या प्रिंटवर काढवून घेऊन गौरी गिल यांनी ‘कलासहकार्या’चं (कोलॅबोरेटिव्ह आर्ट) पाऊल उचललं होतं, त्यापैकी काही कामं इथं आहेतच, पण अतिशय दुर्गम गावांमधल्या शाळांच्या भिंतींवर शैक्षणिक हेतूनं केलेले तक्ते, आकृत्या यातून शिक्षकी प्रयत्नांचं दर्शन घडवणारी गौरी गिल यांची छायाचित्रं मुंबईकरांनी पाहिलेली नाहीत. तुम्ही शिक्षकी पेशाबद्दल आस्था बाळगणारे असाल, तर गावोगावच्या या शाळा पाहून कदाचित हुंदकाही दाटेल.. तो कशाचा? इतके प्रयत्न होताहेत या आनंदाचा? की यांची कुणाला दखलही नाही आणि नसतेच, म्हणून?
बाकी भरपूर..
गुस्ताव कुर्बे हा एकोणिसाव्या शतकातला चित्रकार ‘बंडखोर होता’ म्हणजे काय होता, हे जर जाणून घ्यायचं असेल तर भायखळय़ाच्या राणीबागेच्या आवारातलं, मुंबई महापालिकेच्या मालकीचं ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ आजच गाठा.. कारण फक्त आजच संध्याकाळी सहा वाजता ‘ओरिजिन ऑफ हिज वर्ल्ड’ हा लघुपट इथं दाखवला जाणार आहे. याखेरीज, ‘जहांगीर’, वरळीचं प्लॅनेटोरियमच्या पुढलं ‘नेहरू सेंटर’ इथं प्रदर्शनं सुरू आहेतच, पण रीगल सिनेमाच्या चौकात ‘एनजीएमए’ दालनातलं प्रदर्शन पाहिलं नसेल, तर नक्की पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा