ठाणे – जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून सर्दी – खोकल्याची साथ पसरली असतानाच, आता डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीनेही डोके वर काढले आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे १२ रुग्ण तर, मलेरियाचे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
पहाटेच्या वेळी थंडी आणि दुपारच्या वेळी उकाडा, असे वातावरण सध्या आहे. त्यातच दिवाळी निमित्त फटाक्यांची आतषबाजी झाल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यात गेले दोन आठवड्यांपासून सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे खासगी दवाखाने आणि आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढत असतानाच, आता डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे १२ तर, मलेरियाचे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी डेंग्यूचे नऊ रुग्ण शासकीय रुग्णालयात तर, तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मलेरियाचे आढळून आलेल्या ६४ रुग्णांपैकी ५१ रुग्ण हे शासकीय तर, १३ रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा – कल्याण : कुलगुरू अशोक प्रधान मारहाण प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू
डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक असले तरी हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तितकेच आहे. त्यामुळे रुग्णांनी काळजी घेण्याचे कारण नाही. लक्षणे आढळून आल्यास डॅाक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये धूर आणि औषध फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.
हेही वाचा – औद्योगिक कचऱ्याच्या साठवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल
जिल्ह्यातील डेंग्यू मलेरियाची आकडेवारी
महिना – डेंग्यू – मलेरिया
नोव्हेंबर – १२ – ६४