ठाणे : ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिकेच्या कारभारावर टिका होत असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेत प्रशासक नेमण्यात आल्यानंतर अनागोंदी कारभार वाढीस लागला असून त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांसाठी प्रती चौरस फुटाप्रमाणे पैसे घेण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असून त्याचाच जिल्ह्यातील ठाणे महापालिकेवर आमदार केळकर यांनी टिका केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मुंबईचे दुखणे वेगळे आहे आणि ठाण्याचे दुखण असे आहे की, आम्हाला सांगताही येत नाही आणि बोलता येत नाही. अशा प्रकारची आमची परिस्थिती झाली आहे. प्रत्यक्ष दाखवून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई बांधकामावर केली जात नाही आणि अधिकाऱ्यावरही कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : नियोजन अभावामुळे घोडबंदर भागात पाणी टंचाई; येत्या शुक्रवारी पालिकेत होणार बैठक
दोन वर्षांपुर्वी म्हणजेच करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती. या बांधकामांविरोधात महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई सुरु केली होती. त्यांनी राजकीय दबाब झुगारत बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला होता. परंतु ही कारवाई थंडावताच भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी शहरात बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु केली आहेत. मध्यंतरी अशाचप्रकारच्या दहा बेकायदा बांधकामांची यादी आणि छायाचित्रे असलेला पेन ड्राइव्ह भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. या बांधकामांचे पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारवाई होत नसल्यामुळे शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. हाच मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित करत या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरु आहे. प्रशासक नेमण्यात आल्यानंतर हा अनागोंदी कारभार आणखी वाढीस लागला आहे. ठाणे महापालिकेतील अधिकारी हे बेमुर्वतपणे आणि बेपवाईने अनेक प्रकारची कामे करीत असून या कामांमध्ये अनियमितता आहे. यामुळे ठाणे शहराला अनधिकृत बांधकामांची किड लागली आहे. अनेकदा महापालिकेचे आयुक्त हतबल असल्याचे दिसून येते. अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे दाखविल्यानंतर त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कारवाई होत नाही, असे आमदार केळकर यांनी म्हटले आहे. शासकीय सेवेतून महापालिकेत आलेले अधिकारी आणि महापालिकेतील स्थानिक अधिकारी यांच्यामध्ये वाद होत असून हा वाद पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यापर्यंत पोहचतो. तरीही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
महेश आहेर यांच्या चौकशीची मागणी
सुपारी घेऊन एखादी इमारत धोकादायक ठरविणे तसेच प्रती चौरस फुटाप्रमाणे सुपारी घेऊन अनधिकृत बांधकामांना वाढीस लावणे, असे प्रकार सुरु असून हे कोण करत आहे?, महापालिकेत सरकारचे काही जावई आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत हे चित्र महाविकास आघाडी असल्यपासून बघत असल्याचे आमदार केळकर यांनी म्हटले आहे. काही अधिकाऱ्यांची पदोन्नती कशी झाली, हा चौकशीचा विषय असून त्याचबरोबर त्यांना निरनिराळी खाती कशी देण्यात आली, हाही महत्वाचा विषय आहे. महापालिकेत अनेक पक्षाच्या लोकांनी अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारीनंतरही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असेल तर, त्यांची सखोल चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रति चौरस फुटमागे पैसे घेण्याचे काम सुरु असेल तर त्याची चौकशी होणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दुदैवाने सांगावे वाटते की, एकाही अधिकाऱ्याला अद्याप निलंबित केले गेले नाही. बदलीचा फार्स केला जातो. इतके मोठे घोटाळे झाले पण, कुठल्याही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.