लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन कर्ज वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घालल्याने आता ठेवीदारांनी बँकेच्या शाखांबाहेर जमून आक्रोश सुरू केला आहे. आमच्या ठेवी परत द्या अशी विनंती ठेवीदार करत होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. आपल्या ठेवींचे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर होता. परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून फक्त आश्वासने दिली जात होती. अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये बचत खात्यात अडकले होते. स्वत:ची जमापुंजी काढण्यासाठी परवानगी मागण्याची नामुष्की ठेवीदारांवर ओढावली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेवर निर्बंध आल्याची माहिती ठेवीदारांना मिळताच, सकाळपासून बँकेच्या शाखांबाहेर ठेवीदारांची गर्दी झाल्याचे चित्र होते. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात बँकेच्या शाखा आहे. या शाखेबाहेर नागरिकांची गर्दी जमली होती. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचाही या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. वसंत विहार परिसरातील बँकेच्या शाखेजवळही हेच चित्र होते.

प्रत्येक ठेवीदारांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. एका ठेवीदाराला विचारले असता, काही दिवसांपूर्वीच मी सरकारी बँकेतील खाते बंद करून या बँकेत खाते उघडले होते. मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आणि इतर कामांसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे माझ्या भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) ९७ हजार रुपये या बँकेत गुरुवारी दुपारी आले होते. हे पैसे मी काढणार होतो. परंतु आता बँकेचे निर्बंध आल्याने काय करू असा प्रश्न पडल्याचे त्याने सांगितले.

तर याच परिसरातील व्यवसायिक कुशल जैन यांचेही या बँक खात्यात बचत खाते आहे. त्यांची रक्कम थोडी होती. परंतु त्यांना देखील चेहऱ्यावर चिंता होती. बँकेतील कर्मचारी दारात उभे राहून काळजी करु नका असे सांगत होते. परंतु पैसे केव्हा मिळतील यासाठी ठेवीदार आक्रोश करत होते. यावर बँकेतील कर्मचारी फक्त आश्वासन देत होते. कोणताही अर्ज भरवून घेतला जात नसून आमच्या ठेवींचे काय होणार असा प्रश्न ठेवीदारांकडून उपस्थित होत होता. वसंत विहार येथील बँकेच्या शाखेत लाॅकरमध्ये ठेवलेले दागदागिने परत देण्यासाठी ग्राहकांना टोकन देण्यात येत होते.