ठाणे : दहा दिवसांपुर्वी अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन सोहळा क्रांतीदिनी म्हणजेच बुधवार, ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाण्यात येणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर ठाणे जिल्ह्यात दोन गट पडले. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ दिली. ठाण्यातील पाचपखाडी भागात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून हि जागा आव्हाड यांच्या मालकीची आहे. त्यामुळे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी फ्लॉवर वॅली काॅम्प्लेक्स परिसरात नवे कार्यालय घेतले आहे. २७ जुलै रोजी या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांंच्या हस्ते करण्यात येणार होते.
हेही वाचा >>>ठाण्यात अवजड वाहतूकीत घट पण घुसखोरी मात्र सुरूच
पंरतु उद्घाटनाच्या दिवशी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा होता. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यालय उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सुचना दिल्याने परांजपे यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. आता क्रांतीदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे उपस्थित राहणार आहेत.