ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणारे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पक्षाचे नवे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, गुरूवारी होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात कर्करोग रुग्णालयाची उभारणी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी भुमीपुजन
राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठे बंड झाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेत सामील झाले. या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली. ठाण्यातील पाचपखाडी भागात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून ही जागा जितेंद्र आव्हाड यांची आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पक्षाचे नवे कार्यालय उभारले आहे. फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे कार्यालय उभारण्यात आले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद बंगल्याच्या समोरील बाजूस असलेल्या सेवा रस्त्यावर हे कार्यालय आहे. दरम्यान, या कार्यालयाचे उद्घाटन गुरूवार, २७ जुलैला सायंकाळी ६.३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.