उल्हासनगर: ज्याप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याचा निकाल न्यायालयातून मिळाला, तसाच निकाल मलंगडासाठीही मिळेल अशी आशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. बुधवारी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी होणाऱ्या आरतीसाठी शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड हे शिवसेनेच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंग मुक्तीचा नारा दिला होता. त्यानंतर दरवर्षी माघ पौर्णिमेला शिवसेनेचे वतीने येथे आरती केली जाते. गडावरील स्थान मत्स्यंद्रनाथाचे स्थान आहे असा दावा शिवसेनेकडून केला जातो. मात्र हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.  दरवर्षी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी गडावर येऊन आरती करतात. यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग गडावर येऊन आरती केली तसेच यावेळी उपस्थित यांची संवाद साधताना मलंग गड मुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी दुर्गाडी येथील जागेचा वाद न्यायालयाने निकाल देत सोडवला त्याच निकालाचा दाखला देत हा निकालही न्यायालयातून दुर्गाडी प्रमाणे लागेल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. तर आनंद दिघे यांनी सुरू केलेली सगळी आंदोलनं, उपक्रम, कार्यक्रम आजही जसेच्या तसे सुरू आहेत. कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही शिवसैनिक आहोत. मी कुठेही असलो तरी दरवर्षी न चुकता मलंगगड यात्रेला येतो. धर्मवीर दिघे साहेब न थकता, न थांबता मलंगगडावर जायचे, ती आठवण आजही माझ्या मनामध्ये असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

Story img Loader