ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. ते ऑपरेशन करतात. पण मी डॉक्टर नसताना मोठे-मोठे ऑपरेशन केले आहेत. ते पण भूल न देता केले आहेत. त्यामुळे मला कोणीही हलक्या घेऊ नका अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे असे शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या किसननगर भागातील शिवसेनेच्या शाखेतून शाखाप्रमुख म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. याच किसननगर भागात रविवारी रात्री त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी किसननगर आणि वागळे इस्टेट भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाषणातून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत मी पायाला भिंगरी लावून काम केले.
रात्रीचा दिवस केला. सरकार २४ तास कसे चालते हे लोकांनी पाहिले आहे. आम्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावले, कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीला दैदिप्यमान विजय मिळाला. ते लोक ९७ लढले आणि फक्त २० जिंकले असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगाविला. ठाण्यात क्लस्टर होणार का? हा तर निवडणूकीचा जुमला असल्याची टीका विरोधक करत होते. परंतु आता ठाण्यात पाच ठिकाणी क्लस्टरचे काम सुरू आहे. ठाणेकरांना ज्यादिवशी त्यांच्या हक्काच्या घराची किल्ली दिल्या जातील तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल असेही शिंदे म्हणाले. ‘काॅमन मॅन’ टाॅवरमध्ये राहायला जाईल हे माझ स्वप्न आहे असेही शिंदे म्हणाले.
मी घरे जोडणारा माणूस आहे, तोडणारा नाही. क्लस्टर प्रकल्प हा आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे, आतापर्यंत असा प्रकल्प कधीही झाला नाही असा दावाही त्यांनी केला. ठाणे आता कात टाकत आहे. मुंबई आणि इतर शहरातील लोक ठाण्यात राहायला येत आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो मी ठाणेकर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे असे शिंदे म्हणाले. दिल्लीमधील आपदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूर केली. झाडूची पूर्ण सफाई करुन टाकली आहे. आता दिल्लीच्या तख्तावर हिंदूत्त्वाचा भगवा झेंडा फडकला आहे असा टोला त्यांनी आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांना लगावला.