ठाणे : काही लोक खिल्ली उडवत असत. ‘मंदीर वही बनाएंगे, तारिख नही बताएंगे’, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ मंदिर बांधले नाही, तर त्याचे उद्घाटनही केले आणि सध्या आपल्या देशात अनेक ठिकाणी मंदिरे बांधली जात आहेत. परदेशातही राम मंदिरे बांधली जात आहेत ही आपल्यासाठी खूप भाग्याची आणि अभिमानाची बाब आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

श्री राम नवमी निमित्ताने रविवारी रात्री ठाण्यात शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न होते की अयोध्येत राम मंदिर बांधले जावे. बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते, अयोध्येत राम मंदिर बांधले जावे, राम मंदिर बांधले गेले आहे, म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो असे शिंदे म्हणाले.

आपण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. काही लोक खिल्ली उडवत असत. ‘मंदीर वही बनाएंगे, तारिख नही बताएंगे’, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ मंदिर बांधले नाही, तारीख सांगितली, त्याचे उद्घाटनही केले आणि सध्या आपल्या देशात अनेक ठिकाणी मंदिरे बांधली जात आहेत. परदेशातही राम मंदिरे बांधली जात आहेत हे आपल्यासाठी खूप भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री नाही तर रामभक्त म्हणून हजर..

सर्व रामभक्त येथे आले आहेत आणि म्हणूनच मी तुमच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर रामभक्त म्हणून आलो आहे. येथे सर्व धर्माचे लोक, सर्व बांधव एकत्र येऊन साजरे करत आहेत असे शिंदे म्हणाले.