ठाणे : चैत्यभुमीवरील कार्यक्रमातील नियोजित भाषण रद्द करण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभुमीवरील कार्यक्रमातील भाषणापेक्षा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन माझ्यासाठी मोठे होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
चैत्यभुमीवरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार होते. मात्र, ऐनवेळेस नियोजित भाषण रद्द करण्यात आले. याबाबत सोमवारी ठाण्यात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर दादर येथील चैत्यभुमीवरील कार्यक्रमातील भाषणापेक्षा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन माझ्यासाठी मोठे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभुमीला जाणे, डाॅ. बाबासाहेबांचे दर्शन घेणे आणि त्यांना विनम्र अभिवादन करणे, यापेक्षा दुसरे मोठे काय असू शकते. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती चैत्यभुमीला साजरी झाली आणि आम्ही तिथे सर्वजण गेलो होतो. त्यानंतर ठाण्यातही जयंती कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्याचप्रमाणे हजारो ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. त्याचा आनंद प्रत्येकाला आहे, तसा मलाही आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आपल्याला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येत नाही, असा एकही दिवस नाही. त्यांनी आपल्या देशाला सर्वोत्तम घटना दिली. त्यांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून ही सर्वोत्कृष्ट घटना लिहिली. ते भारतरत्न होतेच पण, विश्वरत्नही बनले, असेही ते म्हणाले. आज प्रत्येकाने बाबासाहेबांचा एक तरी गुण घेतला पाहिजे. त्यामुळेच मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो होतो की, तुमच्यातील एक अंश जरी मिळाला तर हे मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजसेवा करायला उर्जा आणि प्रेरणा मिळेल, त्यापेक्षा दुसरे काय महत्वाचे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर टिका
काही लोक संविधानाची प्रत दाखवून ते बदलणार असल्याचे म्हणत होते. परंतु बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान एवढे मजबूत आहे की ते बदलले जाऊ शकत नाही. संविधान हे कायमच राहील. काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना पराभुत करण्याचे काम केले. त्यांना त्रासही दिला. परंतु २०१४ साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. यापुर्वी संविधान..संविधान म्हणत काही लोक गळा काढत होते, अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.
बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार होते. पण, त्याचबरोबर माणुसकीचे शिल्पकार होते. त्यांनी माणुसकी काय असते, हे शिकवले. माणसाने कसे जगावे आणि कसे वागावे, हे शिकवले. संघटित व्हा, संघर्ष करा आणि न्याय मिळवा हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यामुळे आमचे सरकार बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. महाराष्ट्र सरकार तालुका स्तरावर संविधान भवन उभे करून त्याठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचे काम करीत आहे. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहत आहे, असेही शिंदे म्हणाले.